You are currently viewing घन ओथंबून आले

घन ओथंबून आले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*

 

*घन ओथंबून आले*

 

घनघन माळा नभी दाटल्या कोसळती धारा…‌.

आषाढाचे दिस गेले श्रावणाचा मास आला….

बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो..

असंख्य गाणी मनाच्या अंगणी थुई थुई नाचू लागतात कारण आभाळात आषाढाचे काळे सावळे मेघ दाटीवाटीने जमू लागतात….वातावरण अंधारून येतं आणि कानात थेंबांची टीप टीप लयीत साकारते,आषाढात ऊन पावसाचा खेळात निसर्ग हरखून जातो‌…इंद्रधनूतील सप्तरंगातून

सृष्टी आकाशाचा रंग सोहळा आनंदाने बघत असते…‌

सौदामिनीचे कडाडणे,ती तेजाची लकेर ढगांना जणू बरसायची आज्ञा देते….मेघांचे ढोल वाजू लागतात व सरीतून थेंबांचे मौत्तिकसर अलवार ओघळू लागतात…

तृषार्त धरेच्या गर्भात थेंब झिरपत तिला सजल करतात..

कुशीत हिरवी तांबडी इवली बालरूपे मिरवत काळी आई प्रसन्नतेने हसत असते….

वृक्षवल्लरी पावसाने भिजून सतेज होतात.चटक हिरवागार रंग अधिकच निखरतो,काळे कातळ पाण्याने न्हाऊन तेजस्वी दिसतात तर कडेकपारीतून ,डोंगर द-यातून

खळखळत, धबधबे वाहू लागतात….

उंचावरून कोसळणारे प्रपात रौद्ररूप धारण करतात..‌‌वन्यप्राणी आनंदाने बागडू लागतात…पक्ष्यांची कलकल आसमंत दुमदुमून टाकते…मयूर आनंदाने नाचू लागतात,कोकिळा गाऊ लागते.‌‌.‌फांद्यांना धुमारे फुटतात..‌सर्वत्र सृजन महिमा जाणवू लागतो.नवचैतन्य आसमंत भारून टाकतं.‌‌…

शेतातला चिखल,पायांची ओली माती,भिजलेल्या वाटा..नवनवीनतेने पावसाला सामोरे जातात…‌

अशा वातावरणात मन भक्तीभावनेतही चिंब भिजून न्हातं.

पंढरीची वाट वारक-यांना दिसू लागते…विठुरायाच्या दर्शनाची आस असीम होते व पावलं वारीत चालू लागतात,नाचत,टाळ वीणेची साथ ,अभंग गात विठूच्या भजनात….मन पुलकीत होतं…

सृजनाच्या साक्षीने निसर्गाचं सान्रिध्य मिळणारे सण…नागपंचमी,श्रावण सोमवार,

माहेरची सय,रक्षाबंधन,जन्माष्टमी,पोळा‌.‌‌..

सगळं करता करता गृहिणीची लगबग संपता संपत नाही पण त्यातही किती आनंद वाटतो…

निसर्गाचं निरीक्षण,समीपता तिच्या तनामनाला तृप्त करते.

पत्रीफुलं गोळा करताना नकळत

गीत गाऊ लागते….हा श्रावण घन असतोच असा…

मनही या घनासारखंच भावभावनांनी ओथंबून येतं व लिहू लागतं गाऊ लागतं….

सख्याची आठवण तर पाऊसधारेत चुकार वाटेगत मनात येतेच …ती हलकेच आरशाकडे बघत गुणगुणते‌‌….

सजना है मुझे सजना के लिये…!!

आषाढ मनात कोसळत रहातो…….!!

🎻🎻🎻🎻🎻🎻🎻🎻

अरुणा दुद्दलवार🌹✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा