मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शांतिलाल संघवी आय इंस्टीट्यूट, मुंबई आणि श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (परळ मठ) यांच्या संयुक्त विद्यमाने “दृष्टी – मोफत मोतीबिंदू आणि संपूर्ण नेत्र रोग निदान कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा हा समाजोपयोगी उपक्रम २४ जुलै २०२५ (गुरुवार) रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ३:३० या वेळेत, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (परळ मठ), सेंट्रल रेल्वे मॅकेनिक इन्स्टिट्यूट मैदान, परळ, मुंबई – ४०० ०१२ येथे पार पडणार आहे.
या नेत्र शिबिरात कम्प्यूटराइज्ड दृष्टी चाचणी, कम्प्यूटराइज्ड नेत्रदाब मापन, मोतीबिंदू तपासणी व डायबेटिक रेटिनोपॅथी यांसारख्या आधुनिक चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. तसेच, गरजूंना जवळचा चष्मा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डोळ्यांशी संबंधित आजारांचे वेळेवर निदान व प्रतिबंधात्मक उपचार करण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या शिबिरात सर्व वयोगटांतील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केलेले आहे. विशेषतः ज्या व्यक्तींनी गेल्या एक वर्षांपासून डोळ्यांची तपासणी केलेली नाही, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा अन्य दीर्घकालीन आजार आहेत, ज्यांना डोळ्यांच्या आजारांचा कौटुंबिक इतिहास आहे, डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली आहे, सतत डोकेदुखी जाणवते किंवा डोळ्यांसमोर काळे डाग दिसतात – अशांनी या तपासणीचा लाभ नक्की घ्यावा.
शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांसाठी शांतिलाल संघवी आय इंस्टीट्यूटतर्फे डोळ्यांची संपूर्ण तपासणी केली जाईल. नोंदणीच्या तारखेपासून पुढील ३० दिवसांपर्यंत मोफत तपासणी आणि आवश्यक असल्यास मोफत ऑपरेशनची सुविधाही उपलब्ध असेल. याशिवाय, औषधे आणि चष्म्यांवरही विशेष सवलत दिली जाणार आहे.
या शिबिरासाठी नोंदणी व अधिक माहितीसाठी सचिन कुराडे – ७९७७२६४६७० किंवा सचिन शेट्ये – ९९२०२२०२३९ यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराला येताना आपला योग्य संपर्क क्रमांक सोबत आणणे अत्यावश्यक आहे.
स्वस्थ दृष्टी म्हणजे उज्वल जीवन! म्हणून या समाजोपयोगी उपक्रमात स्वतः सहभागी व्हा आणि आपल्या नातेवाईक, शेजारी व मित्रपरिवारालाही त्याचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करा.

