You are currently viewing पखवाज वादनात पाटच्या ओमकार वेंगुर्लेकरला एम.ए.पदवी प्राप्त

पखवाज वादनात पाटच्या ओमकार वेंगुर्लेकरला एम.ए.पदवी प्राप्त

कुडाळ :

पूण्यश्लोक अहिलादेवी होळकर विद्यापीठातून कुडाळ तालुक्यातील पाट येथील पखवाजवादक ओमकार प्रताप वेंगुर्लेकर याने संगीत पखवाज वादनात एम.ए.पदवी मिळविली. पखवाज विषयात ही पदवी प्राप्त करणारा तो कुडाळ तालुक्यातील पहिला विद्यार्थी आहे. ओमकार वेंगुर्लेकर याचा जन्म पाट सारख्या ग्रामीण भागात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.त्याच्या घरातूनच लहानपणापासून त्याला भजनाचे बाळकडू मिळाले.त्याला भजनाची आवड झाली. बालवयापासूनच त्याने श्री जगन्नाथ संगीत विद्यालयात पखवाज वादनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. या संगीत विद्यालयाचे संचालक व पखवाज अलंकार महेश सावंत यांच्याकडून तो पखवादनाचे व ढोलकी वादनाचे मार्गदर्शन घेतले. बारावी तो शिकत असताना त्याने पखवाज विशारद ही पदवी मिळविली. त्याने संगीत क्षेत्रात अनेक कार्यक्रमांना पखवाज व ढोलकी वादन केले आहे. ढोलकी वादनात त्याचा हातखंडा आहे. जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या ढोलकी बोलली मृदुंगाला या कार्यक्रमासाठी तो पखवाज साथ करतो.पखवाज वादनात त्याने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला. त्याने तालवाद्य कोर्स केला असून यातील मादल,दिमडी,बगलबच्चा, ढोलक,ड्रम अशा कला प्रकाराचे ज्ञान प्राप्त केले आहे. पूण्यश्लोक अहिलादेवी होळकर विद्यापीठातर्फे ओमकार पखवाज विषयात एम.ए. पदवी परीक्षेला बसला होता. तो ही पदवी उत्तीर्ण झाला. त्याच्या या यशाबद्दल जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक,प्रशिक्षक व विद्यार्थी तसेच अन्य सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. आपल्या यशाचे श्रेय आपले आई – वडील तसेच काका भजनी बुवा मोहन वेंगुर्लेकर, सुधीर वेंगुर्लेकर, अमरेश वेंगुर्लेकर आणि गुरुवर्य पखवाज अलंकार महेश सावंत या सर्वांचे आहे. त्यांचे आशीर्वाद व योग्य मार्गदर्शनाने आपण हे यश मिळवू शकलो, असे एम ए पदवीधारक ओमकार याने सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा