*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*लोका सांगे…*
लोका सांगे ब्रह्मज्ञान तो स्वत: कोरडा पाषाण
उपदेशाला न लगे पैसा येते पहा उधाण
हे ऐकावे ते वाचावे सांगणे किती ते सोपे
ज्ञानामृत ते कधी न चाखती रोज नवी ती रोपे..
खोली नाही तळही नाही उथळपणा हा सारा
किती सांगा कितीही शिकवा इकडून तिकडे वारा
काय मला ते कळत नाही ते ही नसे माहिती
अज्ञानाची परिसीमा हो मंदच यांची गती..
तरीही वाटते मीच ज्ञानी मीच जणू गुरूबानी
कसे कळावे सांगा त्यांना असती किती अज्ञानी
कळते तरी का ढोंग पांघरून वावरती कळपात
माणूस बनुनी खरेखरे ते येतील कधी माणसात..
पाणी पडते नित्य घड्यावर राही सदा कोरडा
उपदेशाचा चाले मात्र नित्य पहा ओरडा
सद् बुद्धी दे देवा यांना शहाणपण दे देवा
कशी घडावी यांच्या हातून खरी तुझी रे सेवा…
सारा करती ते देखावा मनच नाही शुद्ध
कांगावा नि थयथयाट ते करती पहा निर्बुद्ध
कर शहाणे देवा त्यांना देई थोडीरे बुद्धी
अज्ञानाचा मळ जाऊनी पावन करी रे नदी…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
