काँग्रेस नेते शिक्षणमहर्षी विकासभाई सावंत यांचे दुःखद निधन
सावंतवाडी:
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा सावंतवाडीच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांचे मंगळवारी वयाच्या ६२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. माजगाव येथील त्यांच्या राहत्या घरी सकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सावंतवाडीसह जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे.
विकासभाई सावंत हे माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सहकार, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रातील तीन दशकांच्या योगदानाला विराम मिळाला आहे. गेली ३६ वर्षे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या विकास सावंत यांनी शहरापासून ते दुर्गम खेड्यांपर्यंत शिक्षणाचा प्रसार केला. सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव व चौकूळ यांसारखी अनेक ज्ञानमंदिरे त्यांनी सुरू केली.
शिक्षण क्षेत्रासोबतच सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून आपला वेगळा ठसा उमटवला होता. काँग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असलेले विकास सावंत यांनी आज राहत्या घरी अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा, नात आणि नातू असा मोठा परिवार आहे. युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विकासभाई सावंत यांचे अंतिम विधी उद्या दुपारी 12 वाजले पासून सुरू होतील.
