मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दर्शना कासवकर यांसह अनेक उबाठा पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश
मालवण
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी सलग दुसऱ्या दिवशी मालवणातील उबाठा गटाला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषदेतील माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दर्शना कासवकर या उबाठाच्या तीन माजी नगरसेवकांसह जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई कासवकर व अनेक उबाठा पदाधिकारी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी भाजपा प्रदेश महासचिव आ. विक्रांत पाटील, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यादी उपस्थित होते.
प्रवेशकर्त्या दर्शना कासवकर या जेष्ठ नगरसेविका आहेत. त्या चार टर्म नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या महिला व बालकल्याण सभापती पदही त्यांनी भूषवले. तर तीन टर्म नगरसेवक असलेल्या मंदार केणी यांनी गटनेते, बांधकाम सभापती आदी पदे भूषवली. तसेच युवा नेतृत्व यतीन खोत यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कार्याकाळात बांधकाम सभापती पद भूषवले. तसेच भाई कासवकर हे सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत आहेत. यांच्यासह अशोक कासवकर,
नंदा सारंग – उपशहर प्रमुख, नितीन पवार – शाखा प्रमुख, सईनाथ वाघ – युवासेना शाखा प्रमुख, अमन घोडावले – अल्पसंख्यांक शाखा युवासेना उप शहरप्रमुख, युवासेनेचे अल्पेश वराडकर, दीपेश पवार, सामाजिक कार्यकर्ते संजय वराडकर यांनीही भाजपात प्रवेश केला. अशी माहिती देण्यात आली आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुका लक्षात घेता मालवण शहर परिसरात भाजपाची ताकद अधिक वाढली आहे.
यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण म्हणाले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावरील विश्वासामुळे भाजपा परिवार दिवसागणिक बळकट होत आहे.
मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजलेली कामे पूर्ण करण्यासाठी आदरणीय मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्व प्रवेशकर्ते यांना आश्वस्त करत सर्वांचे पक्षात स्वागत केले. केणी, खोत, कासवकर यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कामाचेही रविंद्र चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.

