*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आषाढ महिना* 🌹
सोनसळी गहू बाई
साठवते डेऱ्या आड
विठ्ठल पाहुणा आला
आषाढाच्या महिन्यात
त्याच्या भोजनाला केली
बाई पोळी पुरणाची
साजुक तुपाची धार
वर टाकली मायेची
ताटी लावायला केला
दुधसाळी मऊ भात
केळी फनीची ही भाजी
आंबा फणसाची साथ
दुधी भोपळ्याची वडी
वेलीच्या फळाची गोडी
कांडुन कुटुन केली
खीर गव्हाची ही थोडी
कानवला उकडते
गोड सांजोरी भरते
चुल भानोशाची पुजा
वर अत्तर शिंपते
विठुरायाला बसाया
चंदनाचे पीढे पाट
तीन चुले मांडायला
चंद्रभागेचे तीरथं
समईची तेलवात
सुगंधाची उदबत्ती
चंदनाची गंधगोळी
विठ्ठलाच्या लावु माथी
विठ्ठल माझा साजिरा
गोड बाई त्याचे रूपं
आगत स्वागत करु
किती करु उठबस
केळीच्या पानावरती
वाढु सुग्रास भोजन
माझी शबरीची भक्ती
धन्य धन्य भक्तजन
पंढरीचा राजा आला
माझ्या निर्धन कुडीत
भाग्य उजळले माझे
मज जनीची सोबत
राहो निरंतर देवा
तुझी कृपा मजवर
तन मनात गावु दे
नित्य तुझाचं गजर
*शीला पाटील. चांदवड.*
