कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीविषयक प्रयोग सिंधुदुर्गात राबवणार – लखमराजे भोसले
निरवडे येथे शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप…
सावंतवाडी
कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करून गोवा राज्यात सुरू असलेले शेतीविषयक प्रयोग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवता येतील, असे प्रतिपादन संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले. यावेळी त्यांनी “चला शेतीच्या बांधावर” आणि “रेनकोट वाटप” यांसारख्या शेतकरी-केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. सहयोग ग्राम विकास मंडळ, माजगाव आणि श्री समर्थ साटम महाराज सेवा मंडळ, निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी रेनकोट वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा आज निरवडे येथील समर्थ साटम महाराज मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री साटम महाराजांना श्रीफळ अर्पण करून आणि सांगणे देऊन करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष प्रा. श्री. गोडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी व्यासपीठावर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, निरवडे गावच्या सरपंच सौ. सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, श्री साटम महाराज मंडळाचे अध्यक्ष संजय तानावडे तसेच सहयोग ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, सचिव श्री. राणे, खजिनदार श्री. नंदिहळ्ळी सर, सहसचिव बाळू धुरी, सदस्य राजेंद्र बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद गावडे यांनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची घटलेली संख्या याबाबत खंत व्यक्त केली आणि खरेदी-विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर असल्याचे सांगितले. सरपंच सौ. सुहानी गावडे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या मंचांवरून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या असून चांगल्या बियाणे आणि खतांची शेतकऱ्यांना उपलब्धता होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात निरवडे-मळगाव पंचक्रोशीतील सुमारे शंभर शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी निरवडे ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगावचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान समर्थ साटम महाराज सेवा मंडळाच्या वतीने युवराज लखमराजे भोसले, सौ. सुहानी गावडे, अर्जुन पेडणेकर आणि प्रमोद गावडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी मंडळाचे सचिव श्री. राणे यांनी मान्यवरांचे आणि उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साटम महाराज सेवा मंडळाचे अध्यक्ष संजय मोरजकर, अमेय तानावडे, भारत मोरजकर तसेच तृप्ती बोंद्रे, विलास गावडे, सतीश तोरसकर यांनी बहुमोल सहकार्य केले.

