जिल्ह्यात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कापसी येथे पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गावातील 12 मुलांना पोलिओच्या जागी सॅनिटायझर पाजण्यात आले. याप्रकरणी आरोग्य विभागातील समुदाय अधिकारी, आशा वर्कर यांना बडतर्फ केले आहे. याशिवाय अंगणवाडी सेविका यांचा कारवाईचा प्रस्ताव ‘आयसीडीएस’कडे पाठविण्यात आला आहे. याशिवाय प्रभारी वैद्यकीय अधिकारी महेश मनवर आणि भूषण मसराम यांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना लस पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली आहे. ही सर्व मुले एक ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलटीचा त्रास झाल्याने पालकांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यामुळे रात्रीच १२ बालकांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
या घटनेची संपूर्ण चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ अद्यापही करीत आहेत. मुलांना लस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ डोस दिला. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.