*दि. 09 जुलै प्रथम पुण्यस्मरण निमित्त*
आयएएस अधिकाऱ्यांमध्ये जे काही अधिकारी लक्षात राहण्यासारखे आहेत त्यामध्ये स्व.रवींद्र जाधव साहेबांचा वरचा क्रमांक आहे. नाशिक येथून विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य माहिती आयोगाचे आयुक्त म्हणून नेमणूक दिली होती. माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या अमरावतीच्या. त्यांचे आणि श्री रवींद्र जाधव साहेबांचे घनिष्ठ संबंध. त्यामुळे प्रतिभाताई जेव्हा राष्ट्रपती झाल्या तेव्हा त्यांनी श्री रवींद्र जाधवसाहेबांना आपले खाजगी सचिव अर्थातच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अमरावतीवरून दिल्लीला राष्ट्रपती भवनात बोलावून घेतले.
अमरावतीला जिल्हाधिकारी असताना किंवा यवतमाळला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना तसेच राष्ट्रपतीचे खाजगी सचिव असताना आणि नाशिकला विभागीय आयुक्त असताना जाधवसाहेबांनी आपल्या कार्यकाळात जे कार्य केले ते निश्चितच लोकांच्या लक्षात राहण्यासारखे आहे. आज साहेब जरी आपल्यात नसले तरी रहे ना रहे हम महका करेंगे या नात्याने त्यांच्या कार्याचा सुगंध अजूनही त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सेवा दिली त्या त्या ठिकाणचे लोक सांगतातच.
श्री जाधवसाहेबांचा माझा जवळचा ऋणानुबंध होता. त्याला कारणही तसेच होते. माझे व्याही व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अभियंता श्री प्रदीप वानखडे व श्री रवींद्र जाधव हे एका शाळेमध्ये शिकले. त्या शाळेचे नाव शासकीय विद्यानिकेतन. ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली नाही पण गुणवत्तेमध्ये ते कसदार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने नवोदय विद्यालयासारखी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय विद्यानिकेतने सुरू केली. अमरावतीचे शासकीय विद्यानिकेतन हे चिखलदरा या हिल स्टेशनला सुरू झाले. या विद्यालयांमध्ये श्री रवींद्र जाधव व माझे व्याही श्री प्रदीप वानखडे हेच शिकले. त्यामुळे रवींद्र जाधव यांचा वारंवार संपर्क येत गेला आणि तो दृढ होत गेला. या शाळेत असतानाच श्री रवींद्र जाधव यांचे सामाजिक व्यक्तिमत्व घडत गेले.
मा.श्री रवींद्र जाधव हे राष्ट्रपतींचे खाजगी सचिव असताना महाराष्ट्रातील कोणताही माणूस जर राष्ट्रपती भवनात गेला तर त्याची संपूर्ण व्यवस्था शक्य असल्यास राष्ट्रपतींची भेट राष्ट्रपती भवन दर्शन हे सारं आपल्या कर्मचाऱ्यांना सांगून रवींद्र जाधवसाहेब स्वतः करून घेत होते. या माणसाला आपण एकदा जरी भेटलो तरी विसरणार नाही इतके हसरे गोरेपान व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व त्यांचे होते आणि म्हणूनच आज त्यांना जाऊन एक वर्ष होत आहे तरीपण त्यांच्या कार्याचा गोडवा अजूनही कायम आहे व राहणारही आहे.
अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून असताना त्यांनी केलेल्या कामाचे आजही स्मरण होते. लोकाभिमुख समाजाभिमुख जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या नावलौकिक होता. शिवाय जिल्हाधिकारी होण्यापूर्वी काही वर्ष आधी ते या भागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यामुळे त्यांचा जनसंपर्क नावलौकिक सर्वांना माहीत होता. शासकीय कामाबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होणे सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थांना व्यक्तींना मनापासून सहकार्य करणे हा जाधव साहेबांचा स्वभाव होता.
मा. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना अमरावतीला येणार होत्या. मला जसे कळले तसे मी जाधव साहेबांना राष्ट्रपती भवनात फोन केला. माझी जवळपास तेव्हा 17 पुस्तके छापून तयार होत होती. या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते व्हावा असे मला वाटत होते. मी ही गोष्ट जाधव साहेबांच्या कानावर टाकली. ते म्हणाले माझ्या नावाने एक रितसर पत्र पाठवा आणि किती लोक तुमच्याबरोबर असणार आहेत त्यांची नावे पण पाठवा. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले. राष्ट्रपतींना भेटणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मी व माझे मार्गदर्शक प्राचार्य अण्णासाहेब हिवसे व माझे इतर सहकारी यांची नावे होती. माझ्या 17 पुस्तकाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण व्हावे हा योग केवळ जाधवसाहेबांमुळे घडून आला. मी जेव्हा राष्ट्रपतींना भेटलो .तेव्हा योगायोगाने श्री रवींद्र जाधवसाहेब त्यांच्या बाजूला सोबतच होते. पुस्तकाचे लोकार्पण करण्यापूर्वी श्री जाधवसाहेबांनी आठवणीने राष्ट्रपतींना माझी व्यक्तिगत ओळख करून दिली. माझ्याबद्दल दोन-तीन वाक्यामध्ये माननीय राष्ट्रपतींना सांगितले. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले .हा सुवर्णयोग घडून आला तो माननीय श्री रवींद्र जाधव यांच्यामुळेच.
अमरावतीला आनंदवनसारखे तपोवन नावाचे कुष्ठधाम केंद्र आहे. तिथे महामना मालवीय विद्यालय आहे. माझी पत्नी सौ विद्या या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करीत होती. तिने माझ्याजवळ शिक्षकांना व मुलांना घेऊन राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी जाधवसाहेबांना फोन लावला .त्यांनी रितसर अर्ज करून परवानगी घेण्यास सांगितले .मी अर्ज करताच त्यांनी लगेच परवानगी दिली. तपोवन या कुष्ठ धामातील विद्यार्थी घेऊन माझी सौभाग्यवती राष्ट्रपती भवनात पोहोचली. आता कर्नल असलेले माझे जावई श्री सारंग वानखडे व माझी कन्या डॉ.प्राची वानखडे हे तेव्हा दिल्लीलाच होते .ते पण राष्ट्रपती भवनात पोहोचले. जाधवसाहेबांनी राष्ट्रपतींची केवळ भेटच करून दिली नाही तर राष्ट्रपती भवनात तपोवनातील कुष्ठधामातील विद्यार्थ्यांना सुग्रास जेवण देखील दिले. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपती भवन पूर्ण आमच्या तपोवनातील विद्यार्थ्यांना दाखविले. कुष्ठधामातील विद्यार्थी राष्ट्रपती भवनात जेवतात ही फार मोठी गोष्ट त्यावेळेस घडून आली. अशा प्रकारची घटना कदाचित यापूर्वी झाली नसेल आणि भवितव्यात होईल की नाही याविषयी भाष्य करणे चुकीचे आहे.तपोवनातील कृष्ठधामातील विद्यार्थ्यांना किती आनंद झाला असेल यांचे वर्णन शब्दातीत आहे.
मी श्री संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर क्रांतीयोगी गाडगेबाबा हे नाटक बसविले होते. माझे मित्र प्रा.एम.टी देशमुख या नाटकात श्री संत गाडगेबाबा यांची भूमिका करीत होते. 1998 चा तो काळ होता. जाधवसाहेब तेव्हा जिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला कार्यरत होते. आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांना गाडगेबाबाविषयी आदरच होता. ते म्हणाले काठोळे तुम्ही नाटकाकडे लक्ष द्या .नाटकाच्या एका प्रयोगाचा पूर्ण खर्च मी करतो. आम्हाला तिकीट विक्रीसाठी वणवण फिरावे लागले नाही. रवींद्र जाधव साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे आमच्या एका प्रयोगाचा पूर्ण खर्च उचलला .इतकेच नव्हे तर ते स्वतः वहिनी साहेबांबरोबर नाटकही पाहायला आले.
जाधवसाहेब नाशिकला विभागीय आयुक्त होते. तेव्हा आमच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा नाशिक विभागात सुरू होत्या. शेवटची कार्यशाळा संपली तेव्हा चार वाजले होते .मी जाधवसाहेबांना फोन केला. ते कार्यालयात होते .त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले तुम्ही आता सरळ घरी या. कारण की तुम्हाला यायला एक दीड तास लागेल. तोपर्यंत मी कार्यालय संपल्यावर घरी येतो. आम्ही सहाच्या सुमारास कारने नाशिकला साहेबांच्या बंगल्यावर पोहोचलो. सौ वहिनीसाहेब नव्हत्या. साहेबांनीच आमचे स्वागत केले .अल्पोपहार व चहा झाला .तोपर्यंत सात वाजले होते. मी साहेबांना म्हणालो आम्ही आता निघतो. साहेब म्हणाले .कुठे जाणार आहात .मी म्हटलं अमरावतीला. साहेब मला म्हणाले अहो इथून अमरावती 12 तासाचा प्रवास आहे. मी म्हटलं आम्ही वाटेत मुक्काम करू. साहेब म्हणाले वाटेत मुक्काम केल्यापेक्षा माझ्या बंगल्यातच मुक्काम करा आणि उद्या सकाळी प्रस्थान करा. आम्ही त्यांचा शब्द पाळला. साहेबांनी लगेच कुकला आमच्यासाठी स्वयंपाक करायला सांगितला. स्वयंपाक होईपर्यंत आम्ही गप्पा करीत होतो .सौ विद्यापण गप्पांमध्ये सहभागी झाली होती. साहेबांनी त्यांच्या मुलीची खोली आम्हाला निवासासाठी दिली. सकाळी आम्हाला प्रसन्न वदनाने निरोप दिला.
साहेबांच्या मुलीचे लग्न जळगावला होते. मी व माझे पत्रकार मित्र श्री नागेश गोळे आम्ही जळगावला पोहोचलो. लग्नाला स्वतः माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील उपस्थित होत्या. मोठमोठे अधिकारी मोठमोठे राजकारणी लग्नाला आलेले होते. या भाऊगर्दीतही साहेबांनी आमची चौकशी केली .आम्ही नाही म्हणत असताना त्यांच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून आम्हाला विश्राम भवनांमध्ये मुक्काम करण्यास सांगितला. मुलीच्या लग्नाच्या धावपळीतही त्यांनी आम्हाला वेळ दिला. त्यांच्या ठिकाणी असलेल्या आपुलकीचे माणुसकीचे ते जिवंत उदाहरण होते .
.
श्री रवींद्र जाधवसाहेब यांची अमरावतीवरून बदली झाली आणि डॉ.पुरुषोत्तम भापकर हे जिल्हाधिकारी म्हणून अमरावतीला रुजू होणार होते. मी रवींद्र जाधव साहेबांना भेटायला जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. योगायोगाने डॉ. पुरुषोत्तम भापकर देखील चार्ज घेण्यासाठी तिथे आले होते. मी रवींद्र जाधव साहेबांचा जवळचा मित्र असल्यामुळे साहेबांनी मला आत बोलाविले. श्री रवींद्र जाधव साहेब चार्ज देत आहेत व नवीन जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर पदभार स्वीकारत आहेत या घटनेचा मी साक्षीदार आहे. जिल्हाधिकारी दालनात तीन चार शासकीय कर्मचाऱ्या व्यतिरिक्त बाहेरचा मी फक्त एकटाच नागरिक होतो. डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी चार्ज घेतल्यानंतर श्री रवींद्र जाधव यांनी माझा भापकर साहेबांशी परिचय करून दिला आणि भापकर साहेबांना जाधवसाहेब म्हणाले हे काठोळे लष्कराच्या भाकरी भाजणारा माणूस आहे. सामाजिक कार्यासाठी यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले आहे .हा माणूस सदा सर्वदा सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्रभर फिरत असतो. त्यांच्या सामाजिक कार्यात वेळोवेळी आपण मदत करावी. डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी तो शब्द तंतोतंत पाळला. भापकरसाहेब अमरावतीला असो की औरंगाबादला त्यांनी माझे मित्रत्व जपले व आजही ते जपत आहेत.
श्री रवींद्र जाधव साहेबांची दुःखद निधनाची बातमी मला आमचे पत्रकार मित्र श्री नागेश गोळे यांनी दिली. तेव्हा मी अमरावती शहरात माझ्या पुस्तकाच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये होतो. मला जशी बातमी मिळाली तसंच मी कारमध्ये बसलो आणि ड्रायव्हरला म्हटले जळगावला गाडी घे. तो पाहतच राहिला. मी त्याला गाडी वेगाने घेण्यास सांगितले. कारण अंत्यविधीला खूपच कमी वेळ राहिलेला होता. पण रस्ते चांगले असल्यामुळे आम्ही पाच वाजताच जळगावला पोहोचतो. साहेबांचे अंतिम दर्शन घेतले. इहलोक सोडल्यानंतर देखील त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचेच तेज होते. चेहरा तसाच तेजस्वी होता. जाधव साहेबांच्या कन्या पुण्यावरून आल्याबरोबर अंतयात्रेला सुरुवात झाली. डॉ. पुरुषोत्तम भापकर. नागपूरचे जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे व आमचे सामाजिक मित्र श्री अंबादास मोहिते हे देखील अंत्ययात्रेला आले होते. श्रद्धांजलीच्या सभेत या तिघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
जाधव साहेबांसारखी माणसे दुर्मिळ असतात. सामाजिक बांधिलकी जोपासणारे अधिकारी खऱ्या अर्थाने अधिकारी असतात. जाधव साहेबांची गणना त्या अधिकारी वर्गामध्ये करावी लागेल. जिल्हाधिकारी माननीय राष्ट्रपतींचे खाजगी सचिव नाशिकचे विभागीय आयुक्त राज्य माहिती आयुक्त या विविध पदावर कार्यरत असताना त्यांना थोडाही अहंकार शिवला नाही. सर्वसामान्य माणसासाठी हा माणूस सदैव झिजत राहिला आणि म्हणून आज जाधव साहेबांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे तरी त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस आजही त्यांच्या आठवणी इतरांना सांगत आहे .त्यांनी माणुसकीचा दिलेला झरा ही मंडळी आपल्या मित्रमंडळीमध्ये पसरवित आहेत.
परवा जाधव साहेबांचे जावयांचा फोन आला. त्यांनी मला पुण्याला बोलाविले. जाधव साहेबांच्या नावाने स्व. रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन त्यांनी स्थापन केले .या फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम पुण्याला आयोजित केला होता. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलाविले होते. कार्यक्रमाला रवींद्र जाधव साहेबांची सगळी चाहती मंडळी एकत्र आली होती. त्यामध्ये माझे जिवलग मित्र जिल्हाधिकारी श्री अरुणकुमार डोंगरे दुसरे मित्र व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष श्री मधुकरराव कोकाटे सारखे मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त केल्या. जाधव साहेबांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी या ग्लोबल फाउंडेशनतर्फे नियमितपणे विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. मी आवर्जून वहिनी साहेबांना भेटलो. मी आल्याचे पाहून त्यांना खूप आनंद झाला. आम्ही आता आमच्या भागातही स्व.रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशनचे काम सुरू केले आहे. आम्ही पुढे चालवू हा वारसा असेच त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी म्हणावेसे वाटते. जाधवसाहेब आज आमच्यात नसले तरी त्यांनी केलेल्या कामामुळे ते सदैव आमच्यातच राहतील असे अंतर्मन सांगत आहे.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प.
9890967003

