You are currently viewing शिक्षकांकडून समाज घडविण्याचे महान कार्य : पोलीस निरीक्षक शंकर कोरे

शिक्षकांकडून समाज घडविण्याचे महान कार्य : पोलीस निरीक्षक शंकर कोरे

शिक्षक भारती सिंधुदुर्गचा कुडाळ तालुका स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..

तळेरे: दत्तात्रय मारकड

शिक्षक भारती ही खऱ्या अर्थाने शिक्षकांची संघटना वाटली, संघटनेने असेच शिक्षकांच्या हितासाठी निस्वार्थवृत्तीने कार्य करीत रहावे. शिक्षक हे एक उत्तम समाज घडविण्याचे महान कार्य करीत असतात अशा गुणवंत गुरुवर्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मला अभिमान वाटतो असे सांगत केवळ शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे माझ्यासारखे अधिकारी घडले असे गौरवोद्गार कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी कुडाळ येथे काढले.

पो.नि. शंकर कोरे शिक्षक भारती सिंधुदुर्गयांच्यावतीने कुडाळमधील मराठा हाॅल येथे आयोजित कुडाळ तालुका स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव सुरेश चौकेकर, राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण, महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण, प्रगती आडेलकर उपाध्यक्ष जनार्दन शेळके, दिपक तारी, मीडिया प्रमुख दत्तात्रय मारकड, कुडाळ तालुका अध्यक्ष माणिक पवार, सचिव सुशीलकुमार कडुलकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन तालुका अध्यक्ष माणिक पवार यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदू पिळणकर यांनी करताना शिक्षक भारतीच्या कार्याचा धावता आढावा घेतला.

याप्रसंगी सी.डी. चव्हाण, सूरेश चौकेकर, मुख्या. सलीम तकिलदार, श्री. गुरबे, तसेच जानहवी पडते यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व इतर मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, गुणवंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच मुख्याध्यापक यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तर महिला शिक्षिका सावित्री च्या लेकींचाही सन्मानपत्र शाल, श्रीफळ देऊन विशेष गुणगौरव करण्यात आला. तसेच कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांचाही संघटनेच्यावतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

*शिक्षकांनी जागृत राहणे गरजेचे -: संजय वेतुरेकर*

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पुरस्कार हे आमच्या बांधवांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक करण्यासाठी, त्यांना शाब्बासकी देण्यासाठी दिला जातो, म्हटलं तर तो मोठा आणि म्हटलं तर तो लहानही आहे. आपण कोणत्या भावनेने तो स्विकारतो याच्यावर त्याचे महत्त्व अवलंबून राहते. जिथं जिथं शिक्षकांच्या अस्मितेला ठेच पोचली जाते त्या ठिकाणी शिक्षक भारती रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देते. जांभवडे येथील शिक्षक मारहाण प्रकरण किंवा ११ शिक्षकांचा थांबलेला पगार अशा अनेक न्यायी मागण्यांसाठी शिक्षक भारतीने रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. आंदोलन करूनच आम्हाला आमचा न्याय हक्क मिळवावा लागतो आहे. जिथे अयोग्य घडते तिथं शिक्षक भारती प्राणपणाने रस्त्यावर उतरते आणि विजयीही होते. ही ताकद शिक्षक चळवळीची आहे हे विसरता कामा नये, तसेच शासन दिवसेंदिवस शिक्षक विरोधी धोरण राबवत आहे. त्यासाठी संघटितपणे लढा ही काळाची गरज आहे. शिक्षक हा समाजाचा घटक असून त्याने सातत्याने जागृत राहणे गरजेचे आहे असे वेतुरेकर यांनी सांगत, तुमच्यासारख्या गुणी मंडळीच्या सन्मान करण्याचे आम्हाला भाग्य मिळाले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कुडाळ :शिक्षक भारती स्नेहमेळाव्यात गुणवंतांचा सन्मान करताना पोलिस निरीक्षक शंकर कोरे, संजय वेतुरेकर,सोबत चव्हाण,चौकेकर,तारी,सौ. चव्हाण,सौ.आडेलकर, शेळके व अन्य मान्यवर

 

 

 

 

 

 

*..आणि यांच्या कार्यक्रमाने उपस्थितींची मने जिंकली…*

या स्नेहमेळाव्यात विद्यामंदिर कणकवलीच्या शिक्षिका सौ. शर्मिला केळुस्कर यांनी सादर केलेले ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जीवनावरील ‘एकपात्री नाट्यप्रयोग’ आणि कासार्डे माध्यमिक विद्यालयाची नववीमधील विद्यार्थिनी कु. सानिका मारकड हिने सादर केलेला शिक्षक भारतीच्या कार्याचा आढावा घेणारा ‘स्लाईड शो’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

[

दरम्यान याप्रसंगी कसाल हायस्कूलचे शिक्षक शिवाजी पाटील यांनी’ शिक्षक भारती या कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी तर आभार संतोष गोसावी यांनी मानून या शानदार स्नेहमेळाव्याची सांगता केली.

शिक्षक भारतीच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक वर्ग

*अभ्यासक्रमात कळसुत्री कलेचा समावेश हा आमचा मोठा सन्मान*: पद्मश्री परशुराम गंगावणे

महाराष्ट्र शासनाने इयत्ता दहावीच्या पुस्तकात कळसूत्री बाहुल्यांच्या कलेसंदर्भात अभ्यासक्रमात घेतलेला हा विषय आमच्या दृष्टीने या कलेचा फार मोठा सन्मान झाल्याचे गौरवोद्गार पद्मश्री विजेते तसेच सिंधुदुर्गाचे सुपुत्र, लोककलावंत परशुराम गंगावणे यांनी या कार्यक्रमादरम्यान काढले. याप्रसंगी शिक्षक भारतीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

हा मेळावा यशस्वी होण्यासाठी माणिक पवार, सुशीलकुमार कडुलकर,नंदू पिळणकर,मनिष तांबे, विलास राठोड, माणिक खोत, अनिकेत वेतुरेकर, शिवाजी वांद्रे, गिरीश गोसावी, अनिल होळकर,नारायण कोठावळे, सुभाष विणकर, विठोबा कडव,केशव ढाकरे, निखिल ओरसकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा