*सार्वजनिक बांधकामाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यात आणखी काय काय पहावे लागणार आहे..?*
सावंतवाडी:
सावंतवाडी या ऐतिहासिक वारसा जपलेल्या शहरातील ऐतिहासिक अशा दगडी बांधकाम असलेल्या पुरातन तुरुंगाची भिंत आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसात जमीनदोस्त झाली. सार्वजनिक बांधकाम खात्याने काहीच महिन्यांपूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुरुंगाच्या पुरातन दगडी बांधकाम असलेल्या भिंतीवर अदिज ते तीन फूट उंचीचे चिरेबंदी बांधकाम करून त्याला प्लास्टर केल्याचे समजते आहे. या अतिरिक्त बांधकामाच्या दबावामुळेच पुरातन भिंत जमीनदोस्त झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
सावंतवाडी कारागृहाची दगडी इमारत ही संस्थानकालिन पुरातन वास्तू असून सावंतवाडीचे आमदार केसरकर यांनी कारागृह टुरिझम अशी नवी संकल्पना आणून सावंतवाडी सह बांदा येथील पुरातन वास्तू जपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही वर्षांपूर्वी याच कारागृहातून एक कैदी भिंतीवर चढून पसार झाल्याने किंवा अन्य सुरक्षेच्या दृष्टीने अलीकडेच सार्वजनिक बांधकामाच्या माध्यमातून पुरातन दगडी बांधकामावर साधारणपणे तीन फूट उंचीचे चिरेबंदी बांधकाम करण्यात आले होते. त्यावर प्लास्टर करून इलेक्ट्रिक वायरचे सुरक्षा कवच देखील बसविले होते. परंतु हे बांधकाम करताना सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांनी पुरातन भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते का..? ती जुनी भिंत नव्याने तिच्या डोक्यावर लादण्यात येणारा बोजा घेऊ शकते का..? याचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असते. तशाप्रकारची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती का..? जर केलं असेल तर नक्कीच तशी नोंद बांधकामाच्या दफ्तरी असेल. यानिमित्ताने संबंधित बांधकामाच्या अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना घडली, देश परदेशात सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित महाराष्ट्राचे नाक कापले गेले आणि काही बेजबाबदार नेत्यांच्या आश्रयाने बांधकामाचे अधिकारी सहिसलामत बाहेर पडले. तशी परिस्थिती पुन्हा न होता या पुरातन ठेव्याच्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम असो किंवा कारागृह प्रशासन असो त्यांच्यावर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा सावंतवाडीतील ऐतिहासिक ठेव भविष्यात अशीच जमीनदोस्त होऊन ऐतिहासिक सावंतवाडी शहर ही असलेली ओळख कायमची पुसली जाणार हे नक्कीच.

