*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*
*धीर धरी रे धीरापोटी असती मोठी फळे गोमटी*
*धीर धरी रे धीरापोटी फळे असती मोठी फळे गोमटी*
” ए आजी, या देवळात साईबाबांच्या मूर्तीच्या वर*श्रद्धा आणि सबुरी* असे का ग लिहिले आहे? याचा अर्थ तरी काय?” माझ्या नऊ वर्षाच्या नातीने मला हा प्रश्न विचारला.
फार चांगला प्रश्न होता हा!तिला समजेल अशा साध्या भाषेत तिच्या मनातील शंकेचे समाधान केले पाहिजे यात शंकाच नव्हती.
” अगं, श्रद्धा म्हणजे विश्वास!” मी तिला सांगू लागले. ” आपण कोणतेही काम नेहमी विश्वासाने करावे,म्हणजे ते नक्की पूर्ण होते. तसेच विश्वासाबरोबर ते सबुरीने म्हणजे मन शांत ठेवून,त्याला पूर्ण वेळ देऊन करावे म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात आणि आपण आनंदित होतो.
तुम्हाला शाळेत शिकवतात ना? *Haste makes waste*घाई गर्दीत केलेले कुठलेच काम नीट होत नाही,सफल तर होत नाहीच उलट ते बिघडते आणि वाया जाते.
आता परवाच बघ ना! गणितात तुला शंभर पैकी ९६ मार्क्स मिळाले. तुला तर सगळी गणितं येत होती,मग चार मार्क बाईंनी का कापले? घाई घाईत आकडेमोड केलीस आणि संपूर्ण गणित अगदी पद्धतशीर करूनही उत्तर लिहिताना क्षुल्लक चूक केलीस. विनाकारण चार मार्क गेले आणि वर्गातला तुझा पहिला नंबर घसरला.
आपण वर्तमानपत्रात वाचतो, दूरदर्शनवर पाहतो, रोजच्या रोज किती अपघात होत असतात, त्यामुळे किती मृत्यू होत असतात, किती लोकांना इजा होतात. वेग मर्यादा न पाळता गाड्या भरधाव पळवतात. शेवटी काय होते अपघात!बघावे त्याला नुसती घाई. प्रत्येकाला पुढे जायचे असते. अरे, पण घाई न करता शिस्तीत रहा प्रत्येक जण पुढे जाईल. पण छे! मिळेल त्या फटीतून हे मोटर सायकलवाले, रिक्षावाले वाट काढतात आणि रस्त्यावर शेवटी वाहनांची कोंडी होऊन सर्वच मार्ग ठप्प होतात. कोणीच पुढे सरकत नाही. त्यापेक्षा प्रत्येक जण उतावीळ न होता शांतपणे रस्त्यावरून वाहने चालविण्याचे नियम पाळेल तर त्याचे फळ गोमटे असणार नाही का? पादचाऱ्यांनीही क्रॉसिंग पट्ट्यावर उभे राहून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय रस्ता क्रॉस करता कामा नये. वाहन दिसत नाही म्हणून पळत पळत लाईट लाल असतानाच का रस्ता क्रॉस करायचा? काही सेकंदांचा प्रश्न असतो, पण तेवढाही धीर धरता येऊ नये? अनर्थ नाही होणार तर काय?
आज बी पेरले,की लगेच उद्या आपल्याला कधीतरी त्याचे गोड,रसाळ फळ मिळते का? त्यादिवशी एका फळवाल्याकडे मी आंब्याच्या पेट्या पाहिल्या. आंबे न आवडणारी व्यक्ती हजारो/ लाखोत एखादी असेल. माझे पाय आपोआपच त्या फळवाल्याच्या दुकानापाशी वळले. पेटीतले आंबे पाहून मला फार वाईट वाटले. अगदी छोटे फळ आणि कोवळे. त्यांची पूर्ण वाढ होण्याआधीच ते झाडावरून उतरविले होते. त्या फळवाल्याला पैसे कमवण्याची घाई आणि आपल्याला आंबे खाण्याची! अशा उतावळ्या वृत्तीमुळे आपण चांगल्या फळाला मुकतो. झाडावरची कळी पूर्ण उमलल्याशिवाय तोडायची असते का? ती झाडावर पूर्ण उमलली की मगच ते फुल केसात माळण्यासाठी शोभिवंत दिसते.
जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला खूप महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. काय खावे~ प्यावे, कुणाशी मैत्री करावी, कुणापासून चार हात दूर राहावे, पुढे शिक्षणाचे कोणते क्षेत्र निवडावे, व्यवसाय करावा की नोकरी, जोडीदार कसा निवडावा, एक ना अनेक! हे निर्णय घेताना चहूबाजूंनी विचार नको का करायला? *घे सुरी आणि घाल उरी* असे वागून चालते का? आयुष्यात कोणताही निर्णय घेताना त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे जरुरीचे आहे. भोवतालच्या अनुभवी लोकांचे योग्य मार्गदर्शनही फार महत्त्वाचे आहे. बुद्धिबळाच्या खेळात आपली चाल खेळताना आपल्या खेळीला समोरच्याचे काय प्रत्युत्तर असू शकते याचा जसा विचार करावा लागतो, त्याचप्रमाणे कोणताही निर्णय घेताना त्याच्या उलट परिणामाची शक्यता काय असू शकते ही गोष्ट ध्यानात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आणि आवश्यक आहे.
असे असताना घाई घाईत कोणतेही काम उरकणे ही गोष्ट मुळीच चांगली नाही, नुसतं आपण म्हणतो, *हॅव पेशन्स* पण ध्यानात असू द्यावे की *सब्रका फल हमेशा मीठा होता है*
अरुणा मुल्हेरकर
