You are currently viewing श्रावणाच्या उंबरठ्यावर..

श्रावणाच्या उंबरठ्यावर..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*श्रावणाच्या उंबरठ्यावर..*

 

हिरवाई पानातून ठिबकावी असा श्रावण..

झाडे गच्च पानांनी लगडून एकमेकांशी

हितगुज करतात असा श्रावण..

वसुंधरेचे काय विचारावे? ती तर हिरवा,

धानी शालू नेसून अशी काही मुरकते की

बघत रहावे. पान न् पान गच्च हिरवे! त्यात

लपलेले चोचीत चोच घालून गुलूगुलू करणारे

पारवे, पक्षी, बुलबुल, शिंपी, आपल्या पिलांच्या

डोक्यावर पंखांचे छत्र धरून बसलेले, त्यांना चिमणचारा भरवणारे, मायाळू, पिलांसाठी घरट्यातून बाहेर न पडणारे..

असा झुलवणारा लडिवाळ श्रावण, पिलांना

झोका देणारा व महिलांनाही झुलवणारा…

 

जिकडे तिकडे फुले फुलपांखरे उडतांना पाहून

दृष्टी सुखावणारा हा श्रावण नजर ठरू देत नाही

इतका फुललेला असतो. पारिजातकाचे सडे, सदाफुलीचे रंग, गणेश वेलाची रंग बहार आणि

ती ब्रह्मकमळे, शेकड्यांनी ह्याच दिवसात एक

रात्र फक्त उमलणारी पण मन वेडं करणारी अशी

बघून समाधानच होत नाही. पारिजात तर नुसता

सड्यावर सडे घालतो आहे, आवरला जात नाही.

कर्दळी कण्हेर गुलाब गुलछडी मोगरा कोरांटी

बटमोगरा बकुळ जास्वंदी किती नावे घ्यावी?

इतक्या या फुलांचा गजरा माळून बसल्यावर

ही वसु रमणी दिसणार नाही तर काय?

 

सक्काळी पडणाऱ्या पावसात व उतरणाऱ्या

धुक्यात तिचे रूपडे बघून तर कुणी अरसिकानेही

वेडे व्हावे अशा तिच्या रूपावर नजर ठरत नाही.

धुके उतरत असते व या धुक्याचा पडदा, घुंघट

घेऊन वसु अशी काही लाजते की मुखडा दाखवायलाही तयार नसते. काही बघू देत नाही

ती! सारे झाकून टाकते, लुप्त होते नि मग प्रियकर सोनेरी किरणांचा रथ घेऊन दौडत

येताच अशी काही आरक्त होते की तिचे लालगुलाबी गाल बघतच रहावे. किरणांचा साज

लेवून हिरव्याकंच झाडावरील तिचा पिवळा

पितांबर बघतंच रहावा, त्यातून तिने माळलेले

विविधांगी गजरे अशी काही बहार आणतात की

तिचे रूपडे बघावे की डोळ्यात साठवून ठेवावे

हेच समजत नाही.

 

त्यातून मधून येणारे श्रावणातले उन्हातले शिडकावे ऊनपावसात इंद्रधनूचे रिंगण फिरवून

धरणीला व्यापतात व पश्चिमेला रंगांचा खजिना

फुटतो. श्रीरंग हजारो रंगांच्या घागरी अशा काही

सांडतो की ते रंगकाम नजरेतून उतरतच नाही व

त्यात जर बगळ्यांची माळ उडत असेल तर तो

चंद्रहार पाहून माणूस वेडा व्हायचाच बाकी रहातो.

 

सणवार तर एकामागे एक धडका मारतात नि

महिलांची व्रतवैकल्यांची व नटण्या मुरडण्याची

एकच झुंबड उडून त्या नऊवारीतल्या व खचाखच

दागिन्यांनी नटलेल्या महिला पाहिल्या तर स्वर्गातील अप्सरागण कधी खाली उतरला हेच

समजत नाही नि त्या जेव्हा आमराईत झोका

खेळतात तेव्हा मोठमोठ्या कवींची मती ही कुंठित होते. कालच कोकिळ तारस्वरात ओरडतांना प्रियेला हाक घालतांना ऐकला व कळले की हिरवाईत यांचे ही प्रियराधन सुरू

झाले वाटते. उपासतापास नटणे मुरडणे , देवधर्म

मंगळागौर आता फेर धरणार व पायातल्या पैंजण व जोडव्यांसह नववधुंच्या लाजऱ्या फुगड्या सुरू

होणार. पारंपरिक सण व खेळांना उत येणार.

महिला आपली हौस पुरेपुर भागवून घेणार.गाणी

गाणार फुगड्या घालणार पिंगा घालत वन्संना

जावांना चिडवणार व शब्दहारात नवऱ्याचे नाव

गुंफत इश्य! म्हणून लाजणार नि तो ही माजघरातील कोपऱ्यातून डोकावत आपल्या

लाडक्या हरिणीला डोळ्यात साठवणार…

 

एकूणच हे सणवार म्हणजे स्रियांचा विरंगुळा

तर होताच पण त्यातून मनोमिलन, ओळखीपाळखी होऊन सुखदु:खाची देवाणघेवाण होत महिलांना बाहेर पडण्याची ती संधी असे. काही महिलातर महिनोन्महिने घरातच

असत त्यांना जरा सुटका व मोकळिक मिळे.

विचारांची देवाणघेवाण होत असे.एरव्ही कामाच्या धबडग्यात गुंतून पडलेल्या महिलांना

आनंदाचे क्षण मिळत ते इथूनच. सणवारांची तयारी करतांना चेहऱ्यावर फुलणारा आनंद ह्याच

काळात दिसे. दुसरा एक महत्वाचा फायदा म्हणजे या निमित्ताने होणारा भरपूर व्यायाम व

मोकळी हवा ही महिलांना मिळत असे.

 

एकूणच बारामासांचा राजा श्रावण आता कधी टपकेल याचा नेम नाही. महिलांचे, नववधुंचे

मनसुबे तयार आहेत, बस्स्! तो येण्याचा च

अवकाश आहे आता.. जय्यत तयारी झाली

आहे म्हणाना! ये बाबा ये.. धरणी सुखावून तुडुंब

तृप्त झालीच आहे, आता घराघरातील रमणी

सुखावू दे! रांधा वाढा उष्टी काढा चुकणार नसले

तरी दिवस कसे कापरासारखे उडून जाणार आहेत यात जरा ही शंका नाही..

चला तर मग.. भरल्या अंतकरणाने सजलेला श्रावण पदरात झेलत..

 

पिंगा ग पोरी पिंगा म्हणत घागरी फुंकू या…

 

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा