You are currently viewing प्रत्येक विद्यार्थ्यात दडलेला ‘आयएएस’ जागवणारे दीपस्तंभ : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

प्रत्येक विद्यार्थ्यात दडलेला ‘आयएएस’ जागवणारे दीपस्तंभ : प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे 

दरवर्षी मे किंवा जून या महिन्यात केंद्रीय नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर होतो. अन लागलीच सरांचा फोन येतो की यंदा विदर्भातील मुला मुलींचा ही सनदी परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये टक्का वाढलेला आहे. मराठी मुले मुली अभिमानाने हे यश आपल्या कवेत घेत आहेत. आनंद वाटतो हे ऐकून. त्यांनतर त्यांच्या फेसबुकवर व व्हाट्सअप ग्रुपवर या यशस्वी झालेल्या मुलांची यादी झळकते तेही त्यांच्या पत्त्यासह. सर सर्वांशी संपर्क करून आठ दिवसातच त्यांचा सत्कार समारंभ मोठ्या मंचावर आयोजित करतात.यावेळी उपस्थित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या यशस्वी सनदी अधिकाऱ्यांचे या प्रवासातील अनुभव ऐकायला मिळतात. ही प्रेरणा ग्रामीण व शहरी भागा तील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे स्वप्न दाखवून, त्यांना त्या दिशेने झोकून देण्यासाठी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे होत. आज त्यांचा 72 वा वाढदिवस. ते “Mission IAS” या अभियानाचे संस्थापक संचालक असून, आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे प्रभावी मार्गदर्शक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

“शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कलेक्टर दडलेला आहे. स्पर्धा परीक्षा देऊन तो स्वतःचं ध्येय गाठू शकतो,” असे डॉ. नरेशचंद्र काठोळे आपल्या व्याख्यानातून सांगतात. त्यांनी संपूर्ण भारतात ‘मी आयएएस होणारच’ या विषयावर 15 हजाराचे वर व्याख्याने दिली.या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवला. या व्याख्यानाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने भरलेले डोळे आणि ध्येयाशी जुळलेली मने अनुभवली.

तत्पूर्वी अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 1 जुलै रोजी ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे त्यासाठी त्यांनी मिशन आय ए एस च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा सराव करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे. मागील महिन्यात त्यांच्या राज्यातील झंजावाती दौऱ्यात त्यांनी दररोज चार शाळांना भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये आयएएस आणि एमपीएससी परीक्षांचे स्वप्न जागवले. हजारो विद्यार्थी त्यांच्या वक्तृत्वातून प्रेरित झाले. “यूपीएससी आता मातृभाषेत मराठीतून देता येते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीसुद्धा देशसेवेत झळकू शकतो,” असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचे मार्गदर्शन नेहमी नियोजनबद्ध आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला समजून घेणारे असते. UPSC परीक्षेतील प्रत्येक प्रश्न, त्याचे स्वरूप, उत्तर देण्याची शैली, आणि वैयक्तिक तयारीच्या महत्त्वावर ते आपल्या व्याख्याना मधून भर देतात. मिशन आय ए एस जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त एक रुपयात प्रवेश दिला जातो.सोप्या प्रश्नांतूनही मोठे धडे शिकवणाऱ्या त्यांच्या शैलीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मपरीक्षणाची सवय लागत आहे.

त्यांच्या मते, “ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन आणि सातत्य या तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत.” त्यांचे मार्गदर्शन केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात सुद्धा ते मोठी भूमिका बजावतात. त्यांचे “स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी”हे पुस्तक विद्यार्थ्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे. त्यांनी आतापावेतो सत्तर च्या वर पुस्तके लिहली व प्रकाशित केलेली आहेत. दरवर्षी शाळा कॉलेज च्या सुटीमध्ये ते 15 दिवसाचे निवासी संस्कार शिबीर राबवतात.यामध्ये वर्ग दुसऱ्यापासून ते महाविद्यालयीन विदयार्थ्यांचा समावेश असतो. या संस्कार शिबिराच्या

यशस्वीततेमागे विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचा उत्साह असतोच, पण डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचे विचार म्हणजे त्यासर्वाना जोडणारा एक प्रेरणादायी धागा असतो.

ते जेव्हा म्हणतात, “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून अभ्यासात सातत्य ठेवले तर कोणतेही मोठे ध्येय साध्य करता येते,” तेव्हा ही फक्त सल्ला देणारी वाक्य नसतात, तर ते एक विश्वासाचे बीज असते, जे अनेकांच्या मनात उगम पावते.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. ते केवळ शिक्षक नाहीत, तर स्वप्न दाखवणारे आणि त्या स्वप्नांची वाट दाखवणारे एक खरे ध्येयनिष्ठ समाज शिक्षक आहेत.आज 1 जुलै त्यांचा वाढदिवस.त्यानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या मंगल कामना.

==============

रविंद्र दांडगे

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा