वृत्तसंस्था :
दिल्लीच्या लुटियंस भागात औरंगजेब रोडवर असणाऱ्या इस्त्रायली दुतावासाच्या बाहेर शुक्रवारी सायंकाळी सौम्य बॉम्बस्फोट झाला होता. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाच्या तपासाला लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय गुप्तचर एजन्सीसोबत इस्त्रायली गुप्तचर एजन्सी मोसादही या तपासामध्ये सहयोग करत आहे.
हल्ल्यामागे दहशतवाद असल्याची शंका इस्त्रायली अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे. दुतावासाबाहेर एक लिफाफा आणि पत्र सापडले असून त्यावर गंभीर इशारा देण्यात आला आहे.
हा तर केवळ ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून बाकी आहे. कासिम सुलेमानीच्या हत्येचा बदला घेण्यात येईल, असा संदेश पत्रात लिहिण्यात आला होता. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय कट असून इराण याचा सूत्रधार असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात मोसादनेही एन्ट्री घेतली आहे.
मोसाद ही एक कुप्रख्यात गुप्तचर एजन्सी आहे. या गुप्तचर एजन्सीचे जगभरात नाव आहे. इस्त्रायलच्या शत्रूंना शोधून काढून त्यांचा खात्मा करणे, हे मोसादचे प्रमुख काम आहे. आता इस्त्रायली दुतावासासमोर बॉम्बहल्ला झाल्याने मोसाद सक्रिय झाली आहे. हे प्रकरण मोसादने आपल्या हातात घेतले आहे. मोसाद जेव्हा एखादे काम हाती घेते, तेव्हा जोपर्यंत त्याचा छडा लावत नाही तोपर्यंत शांत बसत नाही, असा इतिहास आहे.
दिल्लीत इस्त्रायलच्या दुतावासाबाहेर झालेला बॉम्बस्फोट छोट्या स्वरुपाचा असला तरी त्यामागे एखाद्या मोठ्या कटाची शक्यता वर्तवली जात आहे. जैश उल हिंद नावाच्या एका अनोळखी दहशतवादी संघटनेने या आयईडी स्फोटाची जबाबदारी घेतली आहे. परंतु, सुरक्षा संस्थांकडून अजून याचा तपास सुरु आहे.
स्फोटाच्या ठिकाणी मिळालेल्या पत्रानुसार काही संकेत मिळत आहेत. या पत्रात या सौम्य स्वरुपाच्या स्फोटाला ट्रेलर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी 2012 मध्ये इस्त्रायली दुतावासाच्या वाहनाला लक्ष्य केले होते. यावेळी चौकशीत इराणी संस्थेचा हात असल्याचे समोर आले होते.