सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाचे काम युद्धपातळीवर सुरू …
१४ लाखाचा निधी होणार खर्च; रुग्ण व नातेवाईकांना होणार फायदा…
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयातील आंतर रुग्ण व बाह्य रुग्ण विभागातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी १४ लाखाचा निधी खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना याचा फायदा होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी सांगितले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या ब्रिटिशकालीन इमारतीमधील स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी ७ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजित खर्चासह जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावले यांच्याकडे मागणीपत्र सादर केले होते. त्याचबरोबर रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठीही ७ लाख रुपयांचा निधी असा मिळून एकूण १४ लाख रुपयांच्या निधीची यावेळी मागणी करण्यात आली होती.
पालकमंत्री नितेश राणे यांनी रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या, तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना हे काम त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी १४ लाखांचा निधी तत्काळ मंजूर झाला असून या कामाला गती मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या आंतररुग्ण आणि बाह्यरुग्णांना या दोन्ही स्वच्छतागृहांमुळे मोठा फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त गरोदर आणि बाळंतिण महिलांसाठी रुग्णालयात दानशूरांच्या मदतीने गिझरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांना गरम पाण्याचे स्नान करणे शक्य झाले आहे. श सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने यासाठी गिझर बसवले आहेत. स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
