*ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी जामसंडेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्य*
*यशस्वी अपयश !*
पाऊलवाटेवर पदोपदी
असतात खाचखळगे
नैराश्य, दुःख, क्लेशाचे….
यशाच्यापाठी धावता
हाती येणाऱ्या अपयशाचे!
पण आयुष्याचा मार्ग
संपलाय वाटतानाच
लागते अचानक वळण
कमनीय सुंदर त्यात
असतं जगण्याचं सरण
अनुभूतीच्या धगीतले
असतात बसत चटके
घायाळ मनाला सावरत
माय मात्र असते बडवत
भाकरीचा चंद्र ओल्या चुलीत
पोटाचा खड्डा गर्तेतला तिच्या ,
आयुष्याच्या वाटेवरचं वळण
मात्र असत खुणावत….
नवीन आशा स्वप्नांच्या
हिंदोळ्यावर चालतात
पावलं दबकत येणाऱ्या
अपयशाच्या खाईत जाताना
असते उसळी मारत मन
अंतरातील उर्मीत मग
परत फिनिक्सची भरारी….
अनुभवातून कळले
आयुष्याचा होता पेपर
कठीण कठोर केलेला
अभ्यास भावनांचा
पण पेपरात प्रश्न होते
व्यवहाराचे सोडवताना
जमाखर्च मांडताना
अपयशाचं कुत्सित हसू
वेदनांच्या धगीत झालेलं प्रज्वलित!
आयुष्याच्या वाटेवर…..
जोडलेली माणसे होती
जमा बाजू
अपयशाची यशस्वी बाकी….!!
*मानसी जामसंडेकर, गोवा*

