उच्च शिक्षणाने स्वतः सोबतच समाजाचे नाव उज्ज्वल करा !
उद्योजक राजेश सापळे यांचे प्रतिपदन कणकवली वैश्य समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव भविष्यात समाजाला विसरु नका श्री. महेंद्र मुरकर
कणकवली
आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धक बनले पाहिजे आणि काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगली पाहिजे व असे प्रत्येक विद्यार्थ्याने ठरविले पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन मोठे झालात तर तुमचे नाव समाजात अभिमानाने घेतले जाईल. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत स्वतःच्या नावाबरोबर समाजाच्या नावाची उंची वाढवा असे आवाहन उद्योजक राजेश सापळे यांनी केले. कणकवली वैश्य समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कणकवली वैश्य समाजाचे अध्यक्ष महेंद्र मुरकर म्हणाले की, तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य आपला समाज पार पाडत आहे. त्यामुळे भविष्यात कितीही मोठे झालात तरी समाजाला विसरु नका. समाजाबद्दल आदर भावना ठेवा व समाजातील मुलांसाठी भरीव कामगिरी करुन त्यांना मदत करा.
योजना सापळे यांनी मोबाईल वापरणे जेवढे चांगले आहे त्याच्या दुप्पट तो तोट्याचे देखील आहे. याची उदाहरणे देऊन स्पष्ट केले व मोबाईलचा वापर अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षेसाठी करावा असे सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करताना पी. जे. कांबळे सर यांनी १०वी, १२वी नंतर वेगवेगळे कोर्सेस संबंधी माहिती विषद केली व अभ्यास कसा करावा याबाबत मुलांना टीप्स दिल्या. कणकवली मधील बाबा भालचंद्र महाराज संस्थान यांच्या सभागृहात कणकवली तालुक्यातील वैश्य समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक राजेश सापळे यांच्या हस्ते श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व कांबळे सर यांनी बाबा भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी कणकवली वैश्य समाज अध्यक्ष महेंद्र मुरकर, सचिव अॅड. गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष लवू पिळणकर, खजिनदार विलास कोरगांवकर, सल्लागार दादा कुडतरकर, नागेश मोर्ये, कार्यकारिणी सदस्य राजन पारकर,प्रसाद अंधारी, नाना काणेकर, निलम धडाम, शितल सापळे, उमेश वाळके, सिंधुदुर्ग जिल्हा गुरु सेवा समितीचे अध्यक्ष अॅड. दीपक अंधारी, करुळ हायस्कूलचे मुख्याध्यापक नारकर सर, विद्या शिरसाट, सुप्रिया तायशेटे, माधवी मुरकर व अन्य उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सल्लागार श्री. दादा कुडतरकर यांना कोकण विभागीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
यावेळी सचिव अॅड.गुरुनाथ पावसकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की,प्रशंसा व सत्कारात अडकून न राहता पुढील काही वर्षे मेहनत करा. यश तुम्हाला निश्चित मिळेल. तारुण्यसुलभ प्रलोभनात अडकून न राहता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मोठी स्वप्ने पहा तरच तुम्ही तुमच्या ध्येयापाशी पोहोचू शकाल. यावेळी उद्योजक विष्णू सातवसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले त्यात ते म्हणाले की १०वी,१२वी नंतर व्यवसायिक कोर्सेसचा देखील विचार करावा. प्रास्ताविक अध्यक्ष महेंद्र मुरकर यांनी तर सूत्रसंचालन पोकळे मॅडम यांनी केले. आभार खजिनदार विलास कोरगांवकर यांनी मानले.

