कुडाळ :
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात तसेच निराधार वृद्ध व्यक्तींना आश्रमामध्ये आश्रय देण्याचे काम सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले जाते मु.रायवाडी पो. माड्याचीवाडी तालुका कुडाळ येथील श्री सुरेश बिरजे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांचा जिव्हाळा सेवाश्रम अतिशय उत्कृष्ट व सेवाभावी सेवाश्रम पाच एकर मध्ये उभा आहे. येथे निराधारांना परिवाराचा हिस्सा समजून प्रत्येक निराधार व्यक्तीची योग्य अशी काळजी घेतली जाते. तसेच स्वच्छतेवर खूप भर देऊन येथे इतर सुविधा देखील दिल्या जातात त्यामध्ये वाचनालय, अन्नदान, आरोग्य केंद्र, रुग्णवाहिका सेवा तसेच गोशाळा देखील या संस्थेच्या माध्यमातून चालवली जाते हे सर्वांगीण गुण पाहून या संस्थेला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून नेहमीच मदतीचा हात दिला जातो.
कै.निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, शिल्पा तारी, सावंतवाडी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची रूपा गौंडर (मुद्राळे), शरदनी बागवे व लक्ष्मण कदम यांच्याकडून रोख रक्कम व पाच हजार किमतीचे जीवनावश्यक साहित्य या सेवाश्रमाला देण्यात आले.
सेवाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ एक इन्व्हर्टरची मागणी केली कारण सेवाश्रम मध्ये सतत लाईट जात असते त्यामुळे वृद्धांचे खूप हाल होतात. त्यासाठीसुद्धा नक्कीच प्रयत्न करणार येईल असे संस्थेचे रवी जाधव यांनी सांगितले.
कालच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला तिसऱ्यांदा भेट दिली तेव्हा त्या भेटीमध्ये एक वेगळा अनुभव आल्याचे रवी जाधव म्हणाले. जिव्हाळा सेवाश्रमचे कार्याध्यक्ष सुरेश बिर्जे यांनी या सेवाश्रमाची उभारणी मागचा इतिहास सांगितला.”मी अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती होतो बेळगाव वरून 1986 साली सावंतवाडी शहरांमध्ये काम शोधण्याकरिता आलो परिस्थिती फार बिकट होती भाड्याचे घर घेणे इतके सुद्धा पैसे नव्हते तेव्हा काही दिवस पत्नी लहान मुलांना घेऊन एका आंब्याच्या झाडाखाली काही दिवस संसार केला. काम भेटल्यावर हातात हळूहळू पैसे येऊ लागले तेव्हा सावंतवाडी सालयवाडा वाड्यामध्ये बाळा मोर्य यांच्या जवळ राहण्यासाठी एक छोटासी रूम भेटली तेथे तेथे आठ वर्ष संसार केला.
त्यानंतर बांधकाम कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम करू लागलो पैसे मिळू लागले मुलांना शाळेमध्ये घातलं चांगलं शिक्षण दिलं.
सावंतवाडी मोती तलावाच्या दगडी कठड्याचे बांधकाम, तसेच सावंतवाडी आदिनारायण मंदिरचे काम केले त्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये माझी हळूहळू प्रगती होऊ लागली मित्र मंडळीच्या सहकार्याने स्वतः बारीक बारीक काम घेऊ लागलो नंतर कामाचा व्याप वाढत गेला चार पैसे मिळू लागले आणि त्यानंतर मोठ मोठी कामे घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी मठ, गोवा व कर्नाटकसहित एकूण 118 मंदिराची बांधकामे केली. त्यानंतर पिंगुळी येथे जागा घेऊन घर बांधल मुलांना उच्च शिक्षण दिलं आणि या सर्व घडामोडी मध्ये मला माझ्या पत्नीची खूप मोठी साथ लाभली त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो माझी परिस्थिती चांगली. परंतु मनामध्ये नेहमी एक खंत वाटायची ती म्हणजे मला नेहमी रस्त्यातून येता जाता अनाथ निराधार माणसा दिसायची त्यांना पाहून माझ्या मनात नकळत पूर्वीच्या गरीब परिस्थितीची जाणीव व्हायची पण असाच अनाथ होतो परंतु माझ्यासमोर दिसणारे निराधार यांना आता मी अनाथ होऊ देणार नाही आणि याच विचारातून जिव्हाळा सेवाश्रमची संकल्पना माझ्या मनात रुजली आणि मी हा जिव्हाळा सेवाश्रम उभारला आणि आज या जिव्हाळा सेवाश्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहे. आज या सेवाश्रम मध्ये 25 निराधार वृद्ध आहेत आणि याचं हाताने वृद्धपणाने मृत्यू झालेल्या 60 निराधार वृद्धांना अग्नी दिला आहे. आज या संस्थेमध्ये मी, माझे दोन मुलगे एक मुलगी व माझी पत्नी व एक जिल्हा परिषद निवृत्त कर्मचारी हा विनामूल्य निराधार या व्यक्तींची सेवा करत आहे.
दर महिना एक ते दीड लाख रुपये खर्च येतो परंतु दात्यांच्या माध्यमातून महिना साठ हजार रुपये रक्कम जमते त्यातून खर्च भागत नाही अशावेळी स्वतःच्या पदरचे पैसे मोडून हा सेवाश्रम आम्ही आनंदाने आणि मनोभावे चालवतो आणि त्यातूनच आम्हाला आत्मिक समाधान मिळते असे ते म्हणाले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून अशीच सहकार्याची अपेक्षा त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून केली आहे.
