You are currently viewing *पहिली ते चौथी शाळा दोनच महिने दहावी बारावी अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय*

*पहिली ते चौथी शाळा दोनच महिने दहावी बारावी अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय*

मुंबई : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून आणि दुसरीकडे प्रतिबंधात्मक लसही आली आहे. त्यामुळे यापुढे शाळा पूर्ववत सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्‍वभूमीवर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

 

राज्याची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे.

यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, 25 टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

दरम्यान अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतिक्रिया व्यक्त करा