महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक शशिकांत नेवगी यांना जाहीर
मालवण
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघातर्फे २०२१ चे मानाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. यात महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक शशिकांत नेवगी यांना, कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार सावंतवाडी बांदा येथील मत्स्यव्यावसायिक सौ. राधिका गोविंद कासकर यांना तर आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश पुरुषोत्तम नेरूरकर यांना जाहीर झाला आहे. रविवारी ३१ जानेवारी रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाकडून दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यापारी, उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी महासंघाचा जीवन गौरव पुरस्कार शशिकांत नेवगी यांना जाहीर झाला आहे. नेवगी हे महासंघाच्या संस्थापक सदस्यां पैकी एक असून सावंतवाडीतील सुप्रसिद्ध बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स व उद्योग समुहाचे संस्थापक आहेत. सावंतवाडी अर्बन बॅंकेचे संचालक, सिं.जि.वैश्य समाज मध्यवर्ती समितीच्या संस्थापकां पैकी एक नेवगी आहेत. नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले. राजकीय क्षेत्रात प्रा.मधु दंडवते, साथी जयानंद मठकर यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून नेवगी यांनी कार्य केले. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थात व रचनात्मक कामात सक्रीय सहभाग घेतला तसेच राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ सैनिक म्हणून त्यांनी काम केले.
महासंघाचा कै.माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार सौ. राधिका गोविंद कासकर यांना जाहीर झाला आहे. कासकर या बांदा-सावंतवाडी येथील यशस्वी मत्स्यव्यावसायिक असून घाऊक मासे विक्रीच्या व्यवसाया बरोबर दोडामार्ग शहरात दोन उपहारगृहांच्या संचालिका आहेत. मासे विक्रीच्या व्यवसायात येण्यासाठी अनेक महिला व युवतींना प्रोत्साहन देऊन उद्यूक्त करीत रोजगार मिळवून देण्यात त्या आघाडीवर आहेत. पुरूषांची मक्तेदारी समजले जाणारे अवजड वाहन स्वत: चालवीत मडगाव, वेंगुर्ले, मालवण आदी बंदरात भल्या पहाटे घाऊक मासे खरेदीसाठी जाऊन संपुर्ण सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यांतील किरकोळ मत्स्यविक्रेत्या महिलां व खानावळीं पर्यंत ताजे मासे पोहोचविण्याकरिता अपरीमित कष्ट उपसत स्वत:च्या हिंमतीवर व्यवसायात कासकर यांनी भरारी घेतली. याच बरोबर संगीत विशारद पदवी मिळवतांनाच पेडणे गोवा येथील महिलांना सोबत घेत परंपरागत गोवा शैलीतील संगित भजन मंडळाची स्थापना केली आहे. या भजन मंडळाच्या माध्यमातून अनेक भजन स्पर्धा त्यांनी गाजविल्या आहेत.
तर आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश पुरुषोत्तम नेरूरकर यांना जाहीर झाला आहे. आपली सुवर्ण पेढी सांभाळतानाच व्यापारी संघटनेत उमेश नेरुरकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या पुरस्काराचे वितरण महासंघाच्या व्यापारी मेळाव्यात करण्यात येणार आहे असे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी सांगितले.