प्रवासी बोट वाहतूक सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित करण्याची मागणी
माजी सभापती मंगेश तळवणेकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी
कोकणातील पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी लवकरच सुरू होणारी भाऊचा धक्का ते रत्नागिरी, विजयदुर्ग, मालवण अशी जलद गतीची प्रवासी बोट वाहतूक सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.
श्री. तळवणेकर यांनी यासंदर्भात मंत्री राणे यांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रस्तावित प्रवासी बोट वाहतूक सेवेमुळे निश्चितच कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. या सेवेमुळे कोकणवासीय अवघ्या पाच तासांत मालवण येथे पोहोचू शकतील, जी खरोखरच कौतुकास्पद बाब आहे.
परंतु, ही सेवा केवळ मालवणपर्यंत मर्यादित न ठेवता ती पुढे रेडी बंदरापर्यंत वाढवण्यात यावी, अशी तळवणेकर यांची मागणी आहे. असे केल्यास रेडी, वेंगुर्ला, शिरोडा, मोचेमाड, सातार्डा, सातोसे, आरोंदा या दशक्रोशीतील नागरिकांना मोठा लाभ होईल. सध्या या दशक्रोशीतील ग्रामस्थांना रेल्वे प्रवासासाठी सावंतवाडी रोड (मळगाव) येथे यावे लागते, तर राष्ट्रीय महामार्गावर येण्यासाठी मळगाव किंवा बांदा येथे जावे लागते. विमान सेवेसाठी तर मोपा, वास्को, दापोली, चिपी (सिंधुदुर्ग) अशा दूरच्या ठिकाणी जावे लागते.
प्रवासी बोट सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित झाल्यास या दशक्रोशीतील जनतेचा प्रवास सुलभ आणि जलद होईल. तसेच, पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तळवणेकर यांनी नमूद केले की, रेडी हे सज्ज बंदर असून, या सेवेमुळे या दशक्रोशीला गतवैभव प्राप्त होईल आणि कोकणवासीयांचे प्रवासी जलवाहतुकीचे पन्नास वर्षांचे स्वप्न सत्यात उतरेल. यामुळे रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.
तरी, या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती श्री. तळवणेकर यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.

