*काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*
*माझे बाबा —-*
खरं तर आयुष्यात आपण कोणाच्या पोटी जन्मास येतो हे आपल्या कोणाच्याही हातात नसते.. पण पुण्य किंवा विधी लिखित प्रारब्ध जे असते त्यानुसार आपण पृथ्वीतलावर जन्म घेतो, त्यानुसार आई वडील ,आपले संस्कार, परिस्थिती यानुसार आपलं व्यक्तिमत्व घडतं.
माझे असेच झाले… मी अगदी मध्यम वर्गीय,सर्व साधारण कुटुंबात जन्माला आले ..पण गावातील शांतता, अभ्यास पूर्ण वातावरण, एकट राहण्याची सवय ,वडिलांची शिस्त यामुळे खरंतर आम्ही बी “घडलो ” ,असं म्हणायला हरकत नाही ..त्यांनीच आम्हाला काटकसर, स्वावलंबन ,बचत ,पाणी- पैसा- वीज -गॅस वाचवणं ,पक्षी- झाडं, निसर्गा बद्दल प्रेम, जाणीव, धार्मिक अध्यात्मिक वळण असलं तरी त्याच बरोबर किंवा त्यापेक्षाही शास्त्रीय आणि का, कसं, कोणामुळे, कुठे ही शास्त्रीय ज्ञानाची माहिती लहानपणापासून मनात बिंबवली,त्यामुळे लहान वयात झालेले संस्कार हे आयुष्यभर कामास येतात तसेच आमचे ही झाले.
एक किस्सा आठवतो म्हणून सांगते ,मला सायकल शिकायची होती पण काही केल्या जमेना, एक तर ती खूप उंच होती आणि वर चढलं तर पायडल मारता येईना , पाय पुरेना, त्यात माझी उंची खूपच कमी, चार पाच वेळा त्यांनी स्वतः चढवून, धरून, पळून मला शिकवायला खूप प्रयत्न केला …पण छे , मग शेजारची सायकल घेऊन मी एकदा लांब चालवत नेली, पण नेमकी तेव्हा काजळे बाईंच्या इथे चढ होता, त्यावरून जोरात आपटले, दोन्ही गुडघे फुटले आणि नखही तुटले.. आता मार बसणार म्हणून भीतीने सायकल शेजारी देऊन मी रडत बसले,पाय खूप दुखावला होता, आईने लांबून पहिले पण मुलीला सायकल यावी म्हणून तिची ही मुकधडपड होती… सहा वाजता वडील आले. त्यांना सगळा किस्सा कळला. पण ते अजिबात रागवले नाहीत, मागून येऊन हळूच पाठीवर हात ठेवला.. मला तसंच लगेच दवाखान्यात नेलं.. रडून रडून मी पार थकले होते. घरी आल्यावर त्यांनी खायला देऊन दोनच गोष्टी मला सांगितले , एक म्हणजे शाब्बास, तू हार मानली नाही, तुझी धडपड मला कळते ,मला नक्की समजले एक म्हणजे तूझी सकारात्मकता आणि दुसरी म्हणजे काही येत नसलं तरी स्वतःला कमी लेखायचं नाही..!
बेटा ,या आयुष्यात या पुढेही खड्डे ,उंच डोंगर ,येणार आहेत …आयुष्याची ही सायकल तुला अशीच चालवावी लागणार आहे. प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत, पाठीशी असेलच असे नाही, तर ती किती संयमाने, धीराने ,सरळ रेषेत ,अपघात न करता ,न चिडता , डोकं शांत ठेवून किती आनंदाने चालवणार हे तुझं तूच ठरवायचं आहे… त्यानंतर मग मी स्कॉलरशिप ला आल्यावर त्यांनी मला आणि भावाला सायकलच बक्षीस दिली,अनेक परीक्षा, स्पर्धा ,प्रमाणपत्र, कविता , लेखन, जीवनातील संघर्ष ,नोकरी ,संसार हे सगळं करताना मला त्या सायकलची, पडण्याची आणि पडून पुन्हा नव्याने उभी राहण्याची, सावरण्याची ताकद मिळाली …ती माझ्या वडिलांकडूनच! खरं तर आज ते ८१ रनिंग आहेत पण त्यांचा अमाप उत्साह ,आनंदी स्वभाव, जगण्याची उमेद ,न वैतागता, परिस्थितीवर मात करणे, गरिबीतही स्वाभिमान, पुढील दूरदृष्टी, फिरण्याची आवड, सौंदर्यदृष्टी, लेखन ,नाटकांची आवड करण्यात! करोनात त्यांन जवळपास 70 ते 80 लेख आणि काही कविता लिहून पुस्तक प्रकाशित केलं आजही दुसरा पुस्तक लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.
माझी लेखन कला ही त्यांच्याकडूनच मिळालेले दैवी देणगी असावी असे मला वाटते.. या छोट्या प्रसंगातूनही वडिलांमधला *”मोठा बाप, पिता व मित्र”* मला दिसला, आणि त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे..
लेखन.. योगिनी पैठणकर नाशिक
