ओटवणे-गवळीवाडी येथे विज कोसळून घराचे नुकसान…
सावंतवाडी
मुसळधार पावसाने आणि मध्यरात्रीच्या जोरदार गडगडाटाने ओटवणे गवळीवाडी येथे सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर विजेचा लोळ कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने सुनीता बुराण या बालंबाल बचावल्या आहेत. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू असताना सुनीता बुराण या घरात झोपल्या होत्या. अचानक मोठा आवाज झाला आणि विजेचा लोळ त्यांच्या घरावर कोसळला. या घटनेमुळे त्यांना थोडासा धक्का बसला. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने घराबाहेर धाव घेतली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच त्या यातून वाचल्या. या घटनेत घराची भिंत फुटली असून, विजेचा मीटर जळाला आहे. तसेच घरातील इतर सामानाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या संकटाने सुनीता बुराण पूर्णपणे हादरून गेल्या आहेत. या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून शासनाने सुनीता बुराण यांना तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण यांनी केली आहे.
