*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अघटित…*
विधिलिखित ते कुणा न चुकले दैव गती ही न्यारी
सारे काही ठरले म्हणतो, म्हणतो कृष्ण मुरारी..
अवघ्या काही क्षणात घडले घडले ते धडपडले
घास मुखी अन्नाचा ज्यांच्या त्यांना घेऊन गेले…
कुणी बाप तो कुणी आजोबा काका मामा होता
आधाराचा खांब घराचा कर्ता घराचा होता
काय तिथे आकांत उसळला कल्पनेत ना येतो
जीवघेणा हा प्रवास जीवनी क्षणात बुडबुडा फुटतो…
क्षणभंगुरता पदोपदी ही सामोरी ती येते
किती कोळसे झाले पहा ना जीव ते ओळखू न
येती..
काळे कोळसे अवयवांचे जळून उघडे पडले
असे काय रे पाप तयांनी सांग जीवनी केले…
मुलाकडे कुणी घरटी आपुल्या आनंदे जात ते होते
रात्री उशिरा येतील परतून, तोडून गेले नाते
दृष्टीला हे पुन्हा न दिसतील कुणी कल्पिले होते
अर्ध्यावरती सोडून यात्रा असे कुणी का जाते..
उत्तर नाही जवळी आपुल्या कळसुत्री बाहुल्या
नाचनाचता सुटली दोरी यमसदनास पोहोचल्या
किती तो पैसा सुविधा सुखदा क्षणात विरूनी गेले
चटका लावून सुहृदांना ते होत्याचे नव्हते झाले..
डोंगर दु:खाचा तो पहाड कराड का कोसळली
का रे विधात्या सांग जरा तू पापे कोणती घडली
मनमानी तू करतो म्हणावे, म्हणतो सारे ठरले
जीवनरेषा बघ संपली दैव इथेही हरले…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
