You are currently viewing मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याच्या शासनाचा मानस – पालकमंत्री उदय सामंत

मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याच्या शासनाचा मानस – पालकमंत्री उदय सामंत

मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा..

मुंबई :

देशाचा  अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त शासनाने मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने संगीताचा शास्त्रशुध्द अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज व अत्याधुनिक  सोयी सुविधांनी युक्त असे मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्याचा शासनाचा मानस आहे. या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संगीत रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास लिहिणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या कतृत्वाला साजेसा सांगीतिक वारसा जन्माला यावा. यासाठी संगीत क्षेत्रात सुप्रसिध्द तज्ञ व्यक्तींची निवड करून समितीची स्थापना करण्यात आली आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय सुगम आणि इतर शैलीतील संगीत, विविध वाद्यांचा अभ्यास, ध्वनिमुद्रण, म्यूज़िक प्रोडक्शन करता यावे यासाठी अत्याधुनिक सोयी व अद्यावत अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. या शिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारे संग्रहालय, विविध सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे, वर्तुळाकार प्रेक्षागृहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, संगीत प्रशिक्षणासाठी ओपन थिएटर या संकल्पनेचा समावेश देखील या संगीत महाविद्यालयात करण्यात येणार आहे.

या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात संगीत क्षेत्रात करिअर करून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. श्री. ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे यामध्ये श्रीमती. उषा मंगेशकर, श्री. आदिनाथ मंगेशकर, श्री. शिवकुमार शर्मा, श्री. झाकीर हुसेन, श्री. सुरेश वाडकर, श्री. अजोय चक्रवर्ती, श्री. ए.आर. रहमान, श्री. शंकर महादेवन, श्री. मनोहर कुंटे, श्री. निलाद्री कुमार आणि श्रीमती. प्रियंका खिमानी हे या समितीचे सदस्य आहेत तर समितीचे समन्वयक श्री. मयुरेश पै आणि संचालक, कला संचालनालय हे सदस्य सचिव असणार आहेत, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

लता मंगेशकर दृकश्राव्य माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे आतंरराष्ट्रीय महाविद्यालय सुरू होत आहे ही देवाची कृपा आहे असे मी मानते. शासनाने  कमी कालावधीत यांची सुरुवात केली आणि यासाठी गठीत केलेल्या समितीची घोषणा करत आहेत. याचा खूप आंनद आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी आतंरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव करतील असे सांगून त्यांनी शासनाचे आभार मानले.

श्री.ह्दयनाथ मंगेशकर म्हणाले, हे महाविद्यालय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विश्वातील उत्तम संगीत महाविद्यालय असेल. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याशी अनेक वेळा संगीत महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती ते स्वतः कलाकार असल्याने हे महाविद्यालय व्हावे ही त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे महाविद्यालय सुरू होत आहे याचा आंनद आहे.

उषा मंगेशकर म्हणाल्या, देशातील हे पहिले वैशिष्ट्यपूर्ण संगीत महाविद्यालय महाराष्ट्रात सुरू होईल. आणि तेही माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने. याचा मला आनंद आहे. राज्य शासनाने या महाविद्यालयाची घोषणा करून त्यासाठी समिती सुद्धा गठीत केली. लवकरच हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय नावारूपाला येईल.

श्री. सुरेश वाडकर म्हणाले, या वैशिष्ट्यपूर्ण महाविद्यालयातून उत्तम संगीत अभ्यासक व कलाकार तयार होतील. या महाविद्यालयासाठी मिळालेले शासकीय पाठबळ महत्वाचे असल्याचे श्री. वाडकर यांनी सांगितले. ही समिती अभ्यास करुन शासनास तीन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. यामध्ये-

1.      संगीत महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जागा, इमारत, वसतीगृह, ध्वनीमुद्रण  कलागृह, सराव कक्ष, साधनसामुग्री इत्यादी पायाभूत सुविधा होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.

2.  संगीत महाविद्यालयामध्ये शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी, त्यासाठी आवश्यक असणारा अध्यापकवर्ग त्यासाठी होणाऱ्या खर्चाचा अंदाज सादर करणे.

3. संगीत महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीचा अभ्यास करुन शासनास शिफारस करणे.

4. संगीत महाविद्यालय स्थापन करण्याच्या अनुषंगाने हाती घ्यावयाच्या कामांचे टप्पे निश्चित करून त्याबाबत शिफारस करण्याचा यामध्ये समावेश आहे.

मयुरेश पै यांनी आभार मानले. यावेळी मनोहर कुंटे, आदिनाथ मंगेशकर, प्रियंका खिमानी, निलाद्री कुमार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा