सिंधुदुर्गनगरी
सन 2020-21 मध्ये जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 507 कुटुंबांना 100 टक्के वैयक्तीक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापेकी 47 हजार 475 कुटुंबांना या वर्षात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला असून अद्यापी 71 हजार 32 कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करणे बाकी आहे. सदर पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतींकडून प्राप्त गावकृती आराखड्यानुसार जिल्हास्तरीय आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये 294 महसूली गावातील 11 हजार 88 कुटुंबांना सद्या अस्तित्वात असलेल्या नळ योजनेवर थेट नळजोडणी देण्यात येणार असून अर्वरीत 419 ठिकाणी कार्यात्मक पुनर्रजोडणीची कामे व 158 ठिकाणी नवीन योजनांची कामे प्रत्वारीत केली आहेत. 184 शाळांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. सदर आराखड्यास पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय पाणी व स्वच्छता समितीने मंजूर केला आहे. तसेच जनतेला नियमित व गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक ठेवण, विखुरलेली लोकवस्ती याचा विचार करून सर्वस्तरावरील लोक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन योजनेची अंमलबजावणी करण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत गावामध्ये नव्याने पाणी पुरवठा योजना सूरू करण्यासाठी एकूण भांडवली कर्चाच्या 10 टक्के व डोंगराळ, वन भाग तसेच अनुसुचित जाती व जमातीची लोकसंख्या असलेल्या क्षेत्रासाठी किमान 5 टक्के लोकवर्गणी आवश्यक आहे. ही वर्गणी जल जीवन मिशनच्या मार्गदर्शन तत्वानुसार रोख रक्कमेमध्ये किंवा श्रमदानाद्वारे अदा करता येणार असल्याचे श्रीपाद पाताडे कार्यकारी अभियंता जल जीवन मिशन यांनी सांगितले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या योजनेचा लाभ घेऊन गाव पाणी टंचाई करण्यास तसेच लोकांना स्वच्छ व नियमीत पाणी पुरवठा करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.