You are currently viewing नितळ आकाश

नितळ आकाश

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री मोनिका बासरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*नितळ आकाश*

 

एक सुंदर वाक्य वाचण्यात आलं

” आपला नितळपणा सोडून दुसऱ्याने ढवळलेला गढूळपणा आपण कुरवाळत बसतो.”

खरच किती अर्थ दडलेला आहे ह्या वाक्यात.

आपल्या बालपणात आपण किती निरागस असतो. खेळताना अनेक वेळा आपल्या मित्र मैत्रिणी सोबत आपले भांडण व्हायचे पण आपण त्या वेळी तात्पुरते भांडायचो आणि नंतर मनात काही न ठेवता भांडण विसरून परत हसत खेळत जगायचो कारण तेव्हा आपण फार निरागस होतो.

जसे जसे मोठे होत गेलो तसा हा अवखळपणा , ती निरागसता लोप पावत गेली आणि आपण ते बनत गेलो जे आपण खरंच नाही आहोत “रुक्ष”.

कधी आपण एखाद्या कडून फार दुखावले जातो, खूप हिणवले जातो,कधी कधी कुणी टोचून बोलले तर तेचं मनात ठेवतो.

मनात हा सारा कचरा जमा करत राहतो आणि तो साचून साचून आपलेच मन दूषित करतो. ह्यातून दुसर काही नाही पण चीड, राग, द्वेष, स्वतःविषयी कमीपणा अशा नकारात्मक भावना उत्पन्न होतात ज्या अर्थातच आपलाच घात करतात.

असे वागताना स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. खरंच आपण असे आहोत का? रागीट, तापट,नकारात्मक . का विनाकारण कुणा दुसऱ्यांच्या वागण्यामुळे आपल्या वागण्याची गाडी रुळावरून घसरली?

सगळी उत्तर त्यातच दडली आहेत.

“कमळ चिखलात उगवतं, त्याच्या आस पास फक्त चिखल असतो पण कधी पाहिलंय कमळाला चिखलाने माखलेला?

चिखलात असूनही कमळ स्वतःच अस्तित्व सोडत नाही,स्वतःची सुंदरता,स्वतःच फुलणं थांबवत नाही. उलट ताठ मानेने उभं राहतं.”

मग माणूसच का असा बनतो?

आपल्या आस पास असंख्य अशी लोक भेटतील जी फक्त चिखल उडवण्याचं काम करतील. त्यांच्या सोबत एकच करता येईल ते म्हणजे त्यांच्या कडे दुर्लक्ष. कारण त्यांच्या कडे लक्ष देत राहील तर आपण ते बनतो जे आपण नसतो.

आपल्याला कमळ बनायचं का चिखल हे आपण च ठरवू शकतो.

दुसऱ्याच्या वागण्या मुळे स्वतःचा नितळपणा सोडण्या पेक्षा अशा नकारात्मक गोष्टी कडे लक्ष देणं सोडून द्या.

कदाचित त्या मुळे आपल्या चांगुलपणा ला गालबोट लागणार नाही.

ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका

कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्या पेक्षा त्याला शांत राहू द्या

गाळ आपोआप खाली बसतो …

 

 

©® मोनिका बासरकर

प्रतिक्रिया व्यक्त करा