*जागतिक साहित्य कला अस्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हरवला .. गांव …*
गांव होता हो हिरवा बांध होता टाकोटाक
ढवळ्या पवळ्या जोरात येत मारताच हाक..
बांधा बांधाला झाडोरा लिंब डोलत तालात
पाणी मोटेचं ते गार धबकन थाळण्यात..
हादग्याची ती पोपटी नाकेदार फुले झुंड
उलगडताच निघे बांकदार मध्ये सोंड
सोलूनी ती पिठामधी भजी मलमली मऊ
आता वाटते अजुनी झोके घेत तिला खाऊ..
व्हला बोले हु हु हु हु भरे भितीने कापरे
गव्हावर ती उडत भर्रकन हो पांखरे
येई घाट्याला हरबरा ओठावरती सोलत
डक्स उपटून हाती खात चालत चालत…
झाल्या वाटण्या तुकडे आले चतकोर वाट्या
शेते पडली उदास बांध बांध ते वांझोट्या
झाडे कापली उजाड नाही सावलीला झाड
पानी पडेना हो आता माणसाची मोडे खोड..
शेतकरी ही उदास बांध बांध करपला
गाव हिरवागार हो सांगा कुठे हरपला
नाही लागत हो मन गाव शोधावा तो कोठे
नदी सुद्धा हरवली झाले सारेच वांझोटे…
गेली रया माणसाची पोकळ तो जणू बांबू
शिवणार किती त्याला ठिगळे ती किती सांधू..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

