कणकवली :
जागतिक तंबाखू विरोधीदिनाचे औचित्यसाधून तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन येथे नुकतेच दोन दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांनी तंबाखू व्यसनमुक्तीची शपथ घेतली. व्यसनांपासून दूर राहण्याचा व समाजात आरोग्यदायी विचार रुजवण्याचा निर्धार त्यांनी केला. मानवी साखळी आणि तंबाखू विरोधी घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली.
हा कार्यक्रम डॉ. अनिल नेरुरकर यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या प्रज्ञांगण, तंबाखू प्रतिबंध अभियान, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. मार्गदर्शन सत्राच्या पहिल्या दिवशी सतीश मदभावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्वावलंबन, नीतिमूल्ये आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर श्रावणी मदभावे यांनी तंबाखूचा इतिहास, त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम, व्यसनामुळे होणारी कौटुंबिक आणि सामाजिक हानी यावर माहिती देत विद्यार्थिनींना व्यसनी जोडीदार टाळा, सुरक्षित भवितव्य निवडा, असा सल्ला दिला.
दुसऱ्या दिवशी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी व्हा, स्वावलंबी बना आणि समाजात सकारात्मक बदल घडवा या त्रिसूत्रीचा संदेश दिला. प्रा. प्रशांत हटकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यानंतर स्पर्शिका मदभावे, मेधांश मदभावे आणि स्वरूप परब या मुलांनी व्यसनमुक्तीवर कविता सादर केली. प्रास्ताविक श्रावणी मदभावे यांनी केले. आभारप्रदर्शन सतीश मदभावे यांनी केले. या कार्यक्रमात ८० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोशनी बागवे, स्मितेश पाष्टे, आशिष घाडी, आर्यन पांचाळ, यश खरात, सिद्धांत खांडेकर, साक्षी मेस्त्री, उपासना जाधव, श्रेया साळुंखे यांचे सहकार्य लाभले.

