*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
*सतर्कतेचो इशारो*
आल्या आल्याच काकल्याने प्रश्न विचारला, “अरे ‘सतर्क’ हुन्जे काय?
खरंतर मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटले. कारण तर्क हा विषय काकल्याचा, तोच आज मला त्याविषयी विचारत होता. उत्तर न देता मी मालवणी माणसाप्रमाणे प्रतिप्रश्न केला, “का? काय झालं?”
“ता माका इचारू नको. सतर्क हुन्जे काय ता सरळ सांग” काकल्या मुद्दा सोडत नव्हता.
“सतर्क म्हणजे सावध, सजग” मी पर्यायी शब्द देत म्हणालो.
तसा काकल्या आवाज लावित म्हणाला, “हयता डिक्शनरीतला नको रे. पावसाळ्यात रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट सरकार दिता आणि आमका सांगता, ‘सतर्क रवा’. त्येवा आमी काय करूचा ता सांग.”
काकल्याच्या स्वभावानुसार त्याने थोडा बुचकळ्यात टाकण्यासारखा प्रश्न केला.
मी पुन्हा समजावलं, “अरे पावसापासून सावध राहायचं. पाऊस, वारा, वादळ याचा धोका असतो. म्हणून सरकार सावध करतं.”
“अरे, निश्चित काय करूचा ता सांगा मरे. रातभर जाग्या रवाचा, काय भायर पंचायतीत जावन् निजाचा? काय आणखी काय करूचा? अरे, ह्या वांदरांपासून सतर्क रवाक आमका जमत नाय. ते ऐन पाव्सात नळे फोडून जातत, घरात गळता आणि आमी गळता थय भांडी लायतो. ही आमची सतर्कता.” मी गप्प राहिलो.
काकल्या परत म्हणाला, “सरकारची सोडा, आमची निश्चित जबाबदारी काय ता पष्ट करा मरे. तशे पाच वर्सा राज्य करूक पाटवच्यासाठी येका रातीत दोन हजार घेवन् सतर्क जाणारे आमी, तरीपण येकदा ता सतर्क खेच्याबरोबर खावचा ता सांगारे.” खवचटपणाचा कहर होत चालला होता. तरीही काकल्या बरोबर होता. मला देखील समजत नाही की, ज्यावेळेस सतर्क रहायचं असतं; तेव्हा सरकारला किमान काय अपेक्षित असतं? यावर एकदा चर्चा व्हायला हवी.
काकल्या परत अवसार काढत म्हणाला, “ह्यो मुंबय-गोवा म्हामार्ग वीस वर्सा व्हावताहा, शासन सतर्क नाय काय रे?” काकल्या अजून भरकटेल म्हणून मी त्याला चहा करून आणला, दोन बटर दिले. तरी तो निघताना म्हणालाच, “फाल्या येतय. वायच् अब्ब्यास करून ठेय. या पाव्सात सतर्क होवची इत्सा आसा.”
काकल्या निघाला. आजच्यासाठी तरी तर्कटाला विराम मिळाल्याने मी सुस्कारा सोडला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
