कामळेवीर बाजारपेठेतील सार्वजनिक विहीर कोसळण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल
सावंतवाडी
कामळेवीर बाजारपेठेतील पिण्याच्या पाण्याची एकमेव सार्वजनिक विहीर कोसळण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे, जलजीवन योजनेअंतर्गत बांधलेल्या या विहिरीला केवळ तीन ते चार वर्षे झाली असून, पाच वर्षांचा कालावधीही पूर्ण झालेला नाही, तरीही तिची ही दुरवस्था झाली आहे.

मे महिन्यापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामळेवीर बाजारपेठेतील ही सार्वजनिक विहीर सभोवती खचली आहे. यामुळे विहिरीच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याचे दूषित पाणी थेट विहिरीत शिरले असून, संपूर्ण पाणी गढूळ आणि दूषित झाले आहे. या परिस्थितीमुळे कामळेवीर बाजारपेठेतील सुमारे पस्तीसहून अधिक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही विहीर कामळेवीर परिसरातील एक महत्त्वाचा जलस्रोत असल्याने, तिच्या सद्यस्थितीमुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज असूनही, झाराप ग्रामपंचायत या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात झाराप ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी आणि लेखी निवेदने देऊनही त्यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या या विहिरीचे दूषित पाणी पिण्यामुळे बाजारपेठेतील तसेच इतर ग्रामस्थांना विविध आजार उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत, लवकरात लवकर झाराप ग्रामपंचायतीने कामळेवीर बाजारपेठेतील ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. जर या परिस्थितीत कुणी आजारी पडल्यास किंवा साथीचे आजार उद्भवल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी झाराप ग्रामपंचायतीची राहील, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
तसेच, येत्या दोन दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यास, सर्व ग्रामस्थ महिला झाराप ग्रामपंचायतीसमोर घागर घेऊन उपोषणाला बसतील, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालून, कामळेवीर बाजारपेठेतील ग्रामस्थांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.



