बांदा, तेरेखोल नदीपात्रात उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता; बेपत्ता बालकाचा शोध सुरू
बांदा
बांदा, तेरेखोल नदीपात्रात कुटुंबासोबत आंघोळीसाठी उतरलेला सात वर्षीय बालक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने होडीच्या सहाय्याने बेपत्ता बालकाचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या बालकाचे कुटुंबीय शेर्ले येथे मंदिराचे काम करत आहेत. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा बालक आपल्या कुटुंबासह तेरेखोल नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला होता. तेरेखोल नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने आंघोळ करत असताना बालक गटंगळ्या खाऊ लागला आणि कुटुंबाच्या डोळ्यादेखत पाण्यात बुडाला. कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र नदीपात्र खोल आणि विस्तीर्ण असल्याने बालक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरु केली आहे. पाण्याचा प्रवाह जलद असल्याने शोधमोहीम राबवण्यासाठी होडी मागवण्यात आली आहे. बेपत्ता बालकाचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

