You are currently viewing गोव्यातून सांगलीकडे होणारी ४७ गुरांची वाहतूक बांदा पोलिसांनी रोखली

गोव्यातून सांगलीकडे होणारी ४७ गुरांची वाहतूक बांदा पोलिसांनी रोखली

गोव्यातून सांगलीकडे होणारी ४७ गुरांची वाहतूक बांदा पोलिसांनी रोखली

११ जणांवर गुन्हा दाखल : ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा

होंडा (गोवा) येथून सांगली च्या दिशेने केल्या जाणाऱ्या गुरांच्या बेकायदा वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. यात तीन आयशर टेम्पो व पिकअप टेम्पोत तब्बल ४७ गुरे अक्षरशः कोंबण्यात आली होती. या कारवाईत गुरांसह तीन आयशर टेम्पो व एक पिकअप टेम्पो असा एकूण तब्बल ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी रात्री ११.३५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली पोलीस चेकपोस्टवर करण्यात आली.

बांदा पोलीस स्टेशनमध्ये रात्री मोठ्या संख्येने गोरक्षक दाखल झाले होते. गुरांची गवत, पाण्याची सोय न करता त्यांना दाटीवाटीने टेम्पोत कोंबण्यात आले होते. त्यामुळे गोरक्षक कमालीचे संतप्त झाले. यावेळी बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. गुरांची अमानुषपणे वाहतूक करणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

त्यानुसार रात्री उशिरा सुनील ज्ञानेश्वर पाटील (बेळगाव), अमोद फुशन शर्मा (बिहार), किरण भांगरे (फोंडा गोवा), बाबू इलाही जामदार (शिरोळ कोल्हापूर), सतीश बाबुराव पुजारी (शिरोळ कोल्हापूर), नामदेव पंढरीनाथ पाटील (कवठेमहाकाळ सांगली), सुलोचना महेश गिरोडकर (गोवा), पोपट जयवंतराव पाटील (कवठेमहाकाळ सांगली), प्रदीप हैबती सव्वासे (कोल्हापूर), सुरत शौकत लकडे (कोल्हापूर) आणि श्याम रामराव कुलकर्णी (सांगली) या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

आज सकाळी सर्व ४७ गुरांना मूळ होंडा गोवा येथे सोडण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा