You are currently viewing निसर्गाचो पूत

निसर्गाचो पूत

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

काकल्याचे तर्कट-१५

 

*निसर्गाचो पूत*

 

बाहेर पाऊस पडत होता. त्यात काकल्या आला. हातात छत्री होती, पण तो पूर्ण भिजला होता. मी म्हटलं, “अरे भिजलास ना रे!”

“मगे? पावसात नाय भिजतलंय, तर काय न्हिबरात भिजतंलय?” नेहमीप्रमाणे काकल्याचे तर्कट चालू झाले. याचं उत्तर न देता मी त्याला अंग पुसायला टाॅवेल दिला. गरम गरम चहा दिला. म्हटलं, “यंदा मे महिन्यातच पाऊस चालू झाला ना रे? लोकांची पंचाईत झाली. अवकाळ्यानं पूरी वाट लावली.”

काकल्या खवळला, “हेका अवकाळी म्हण्णत नाय. ह्यो पूर्वमान्सून. वरातीत, मिरवणुकीत जशे धा-वीस फुडे चलतत आणि फाटसून वरात येता;तसो ह्यो पाव्स. मान्सूनच्येच ढग, थोडे फुडे इले इतक्याच. मे म्हयनो, जून म्हयनो ह्यो आपलो हिशेब. निसर्ग तेच्या हिशेबान चलता. आता याक सांग, दिवे केवा लागले?”

‘दिवे लागणे’ म्हणजे ‘धनिष्ठानवकारंभ’ हे मला माहिती होतं. ते १९ मे ला लागलं होतं, तसं मी त्याला म्हटलं.

“१९ तारीख, म्हंजे तेच्या आधी पाव्साची कामा करूक होयी मां? येळ तुमी लायलास. “काकल्याचे म्हणणे बरोबर होते. आमच्या इथे कोकणात ‘दिवे’ कधी लागणार, याची लोक चौकशी करत असतात. तत्पूर्वी घर शिवणे, जळाव भरणे आदी सर्व कामे पूर्ण करतात. यंदा जरी लवकर, तरी १५ मे नंतर पाऊस सुरू झाला म्हणजे काकल्या बरोबर होता.

थोडं सावरत काकल्या पुन्हा म्हणाला, “निसर्गाक आपून समजान घेवक् होया, तसा वागाक होया.

लोका शेती करत नाय, रेशनचा खातत. निसर्गात रवणत नाय. उतरत्या छपराची घरा नाय, स्लॅपाच्या घरात रवतत. गोठ्यात गोरवा नाय, कुणग्यात शेती नाय. निसर्गाचा म्हणणां आपणाक समाजतला कसा?”

काकल्याचे म्हणणे बरोबर होते. मी समजून घेत होतो. काकल्या उसळत होता.

“मळबट येता, शेवरो फुलता, चाफो उलागता अश्यावरसून पाव्साची सूचना मेळता. पून तुमी घरात नायतर हाटेलात. तुमका कळतला कसा?”

काकल्या तसाच वैतागत जायला उठला.

“असो-असो, पण तू भिजू नकोस.” मी आपुलकीने म्हणालो.

“माजी काळजी करू नको तू. मी भित्तलय, माका कोंब येवच्ये नाय. सर्दीय जावची नाय. तुमी सुदरा म्हंजे झाला.” मिटलेली छत्री हातत धरून काकल्या भिजत चालू पडला. निसर्गाचा पूत निसर्गात मिसळताना पहातानाचे ते दृश्य खूप विलोभनीय होते. ही सकाळ मला खूप सुखावून गेली.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

 

प्रतिक्रिया व्यक्त करा