तुरीच्या खरेदीसाठी 30 डिसेंबरपासून नोंदणी सुरु झाली. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी देखील शासकीय हमीभावाने तुरीची खरेदी अद्याप सुरु झालेली नाही. मोठ्या कष्टाने पिकवलेली तूर खरेदीविना शेतकऱ्याच्या घरातच पडून आहे.
बीडच्या घोडका राजुरी गावच्या श्रीराम घोडके यांनी दोन एकरातून पंचवीस क्विंटल तुरीचं उत्पन्न काढलं. विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी देखील केली, मात्र खरेदी केंद्र सुरु नसल्याने महिन्यापासून तूर घरातच पडून आहे
हीच परिस्थिती चिंचवडगाच्या शिवाजी गवारे यांची आहे. दहा क्विंटल तूर विक्रीसाठी त्यांनी मोंढ्यात आणली खरी मात्र खरेदी केंद्र चालू होण्याचा आदेश लाल फितीत अडकल्याने त्यांना आपली तूर एका खाजगी व्यापाऱ्याकडे ठेवावी लागली आणि त्यासाठी त्यांना रोज भाडं देखील भरावं लागतं आहे.
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने तुरीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र खरेदी केंद्र अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली तूर कवडीमोल भावाने खाजगी व्यापाऱ्यांना विकावी लागत आहे. त्यामुळे आता शेतकरी शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी करत आहेत.
गेल्या वर्षी देखील तुरीची खरेदी उशिरा सुरु झाल्याने अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. आता शासकीय अधिकारी आणि व्यापारी संगनमत करुन शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु करण्यास विलंब करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब नरवडे यांनी केला.
आतार्यंतराशेहून अधिक शेतकऱ्यांनी शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत तूर विक्री करण्यासाठी नोंदणी केलेली आहे. तर शासकीय खरेदी केंद्राच्या भावात आणि खाजगी व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या भावात मोठी तफावत असल्याने बाजार समितीने देखील शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला आहे
एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्याकडील मालाला हमीभाव मिळावा म्हणून रस्त्यावर उतरत आहेत. तर दुसरीकडे महिन्याभरापूर्वीच तूर खरेदीच्या नोंदी झाल्या खऱ्या परंतु अद्याप खरेदी न झाल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. सरकारचा नवीन अजेंडा नाही मात्र यामुळे तूर उत्पादक शेतकरी पुरता उद्ध्वस्त होत आहे हे सरकारला सांगायचे कुणी?