You are currently viewing वारसा साहित्य मंचाचे पहिले राज्यस्तरीय वारसा कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

वारसा साहित्य मंचाचे पहिले राज्यस्तरीय वारसा कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

छत्रपती संभाजीनगर – वारसा साहित्य मंचाच्या वतीने आयोजित दिनांक 25 मे 2025 रोजी मराठावाड्याचे मुख्यालय असणाऱ्या ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगर येथे जिजाऊ मंदिरामध्ये पहिले राज्यस्तरीय वारसा कविसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मा. भारत सातपुते (लातूर) यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका मा. प्रिया धारूरकर होत्या, तर स्वागताध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलकार मा. रज्जाकभाई शेख आणि प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध गझलकार मा.बाळासाहेब गिरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारसा साहित्य मंचाचे संस्थापक अध्यक्ष कवी श्री अर्जुन गायकवाड यांनी केले ज्यामध्ये वारसा साहित्य मंचाचे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमा विषयी माहिती दिली. भविष्यातील उपक्रम, साहित्य मंचाचे उद्दीष्टे सांगितले. राज्यभरातील ६० कवी-कवयित्रींनी आपल्या सुमधुर कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.भारत सातपुते यांनी सांगितले की, लेखकांनी पुस्तक प्रकाशना सोबत पुस्तक वितरणा कडेही लक्ष दिले पाहिजे. कविता हा श्वास झाला पाहिजे तसेच लिखाणात सातत्य असलं पाहिजे. सरांनी वास्तवादी हुंडाबळी वर आधारित कविता सादर केली.

या संमेलनात चार कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले ज्यामध्ये काव्यगंध प्रकाशन अंतर्गत कवी श्री. अर्जुन गायकवाड संपादित ‘वारसा प्रतिनिधिक काव्यसंग्रह, कवी श्री. ज्ञानदेव डिघुळे लिखित ‘आप्पा शब्दांचे दर्पण, समिक्षा प्रकाशन निर्मित कवयित्री रेखा बावा लिखित ‘साद मनाची व गुरुमाऊली प्रकाशित कवयित्री मनिषा पिंगळकर – जाधव लिखित ‘जन्म बाईचा बाईचा’. या चारही प्रकाशित काव्यसंग्रह विशेष आकर्षण ठरली. स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध कवी, गझलकार मा. रज्जाकभाई शेख यांनी वारसा साहित्य संमेलनाला शुभेच्छा दिल्या. तसेच बाप, प्रेम या विषयावर अप्रतिम गझल सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर प्रमुख अतिथी नाशिक येथील सुप्रसिद्ध गझलकार मा. बाळासाहेब गिरी यांनी कार्यक्रम नियोजनाचे कौतुक केले. लेक हि भावस्पर्शी गझल सादर करत अनमोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना मा. प्रिया धारूरकर यांनी सांगितले की, ‘श्रेष्ठ कविता ती असते जिच्यात भावनांची,मानवी संवेदनांची, मानवी नातेसंबंधांची, मानवीय आस्थेची आणि मानवी दुःख, यातनांची ती ही कोणत्याही दिखाऊपणाशिवाय मुखवट्या शिवाय तिची अभिव्यक्ती झालेली असते. वाचनाने माणूस समृद्ध तसेच सुसंस्कृत होतो आणि लिहिण्याने माणूस परिपूर्ण होतो. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन कवी श्री पवन शेळके यांनी केले. सहभागी कवी कवयित्री यांनी आई, वडील, निसर्ग , सामाजिक, शैक्षणिक, शेती मातीच्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी काव्यगंध साहित्य समुह व काव्यगंध प्रकाशनचे संस्थापक कवी श्री.प्रशांत गोरे, तसेच ॲड.अक्षशिला शिंदे, तसेच जायकवाडी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता श्री.बाळासाहेब सातपुते, श्री प्रकाश कुलकर्णी, श्री सुरेश कुलकर्णी, शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री संजय वाघमारे, महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री.संजय खाडे यांची विशेष उपस्थिती लाभली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, साहित्य क्षेत्रात वारसा साहित्य मंचाने भरीव पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया मान्यवर, रसिकांकडून मिळत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन वारसा साहित्य मंचाचे अध्यक्ष कवी श्री अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष कवी श्री पवन शेळके, सचिव कवी श्री ज्ञानदेव डिघुळे, कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा