*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वारकरी विठ्ठल…*
टाळ चिपळ्यांचा नाद
रोमरोमी घुमतसे
पांडुरंग पांडुरंग
हर वारकरी दिसे…
तुळशीहार गळ्यात हा
माथी चंदन बुक्याचा
हातामध्ये हात असे
वारकरी विठ्ठलाचा…
पायी चालतो विठ्ठल
रखूमाई चाले साथ
दोघे मिळून करती
सुखदु:खावर मात..
देवळात नाही देव
राहुटीत तो नांदतो
चूनभाकरीसवे तो
कांदा मुळा ही चाखतो..
चालचालूनी दमतो
वाऱ्यावर तो झोपतो
सुखदु:खे वारीतली
सवे कानांनी ऐकतो..
भक्तीभाव पहातो तो
मनोमन सुखावतो
पंढरीत न थांबता
वारकऱ्यांत सामावतो…
म्हणून म्हणती माऊली
वारकऱ्यातंच देव
सुखदु:ख विसराया
वारी आहे एक ठेव…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
