शक्तिपीठ महामार्गासाठी गेळे येथील जमिनीचा मोबदला पात्र लाभार्थी कुटुंबांना मिळावा
संदीप गावडे यांचा नेतृत्वात ग्रामस्थांची शासनाकडे मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी गेळे गावातील सुमारे १२२ एकर जमीन संपादित केली जाणार असून, या भूसंपादनाचा मोबदला गेळे येथील कबुलायतदार पात्र लाभार्थी कुटुंबांना समान आणि न्यायपूर्ण पद्धतीने मिळावा, अशी आग्रही मागणी माजी पंचायत समिती सदस्य संदीप एकनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे करण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण मागणीसाठी गेळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी गेळेचे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस आणि चेतन गवस यांच्यासह प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
शक्तिपीठ महामार्गामुळे गेळे गावातील एक मोठा भूभाग बाधित होणार आहे. या संपादित होणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला वेळेत मिळावा आणि तो थेट पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.
संदीप गावडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, जमिनीचा मोबदला वाटप करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, सर्व कबुलायतदार पात्र लाभार्थी कुटुंबांना समान हक्काने मोबदला मिळाला पाहिजे.
या मागणीच्या अनुषंगाने, सदर अनुदान प्रक्रिया राबवत असताना महामार्गासाठी लागणारे निश्चित क्षेत्र वगळून, उर्वरित क्षेत्राचे वाटप २६ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तावित वाटप नकाशांमध्ये आवश्यक बदल करून करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे जे भूधारक या महामार्गामुळे विस्थापित होणार नाहीत, त्यांनाही त्यांच्या उर्वरित जमिनीचा योग्य हक्क मिळेल आणि भविष्यातील प्रशासकीय अडचणी दूर होतील अशी अपेक्षा आहे.
संदीप गावडे यांनी सांगितले की, “गेळे गावातील अनेक कुटुंबांचे जीवन या जमिनीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.”
या मागणीमुळे गेळे गावातील अनेक कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या निवेदनावर लवकरच कार्यवाही अपेक्षित आहे. ग्रामस्थांच्या या एकजुटीमुळे आणि संदीप गावडे यांच्या नेतृत्वामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
