You are currently viewing एक महिन्याचं वीज बिल माफ करा:- वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाची सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत मागणी

एक महिन्याचं वीज बिल माफ करा:- वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाची सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत मागणी

*एक महिन्याचं वीज बिल माफ करा:- वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग व व्यापारी महासंघाची सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत मागणी*

*वीज ग्राहकांच्या नुकसानीला महावितरणचे अधिकारी जबाबदार*

सावंतवाडी :

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील वीज समस्या लक्षात घेऊन घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. या भूमिकेला आम्ही पाठिंबा देत आहोत. महावितरणचे अधिकारी त्यांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे आम्ही खरी माहिती पालकमंत्री यांच्याकडे सुपूर्द करू अशी माहिती व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली. तसेच महावितरण ही कंपनी म्हणून काम करत आहे. अधिकाऱ्यांच्या भोंगळ अन् बेजबाबदार कारभारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांचं एक महिन्याचं बील माफ करावं अशी मागणी त्यांनी केली. सावंतवाडी येथे वीज ग्राहक संघटना व व्यापारी महासंघ आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड(सावंतवाडी), जिल्हा सचिव दीपक पटेकर (सावंतवाडी) जिल्हासमन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर (वेंगुर्ला), बाळासाहेब बोर्डेकर (सावंतवाडी), सुभाष दळवी (दोडामार्ग), भुषण सावंत (दोडामार्ग), तुकाराम म्हापसेकर,(सावंतवाडी), संतोष तावडे (सावंतवाडी) श्रीकृष्ण तेली,(सावंतवाडी) संजय गावडे (वेंगुर्ला), जयराम वायंगणकर (वेंगुर्ला), वैभव फटजी (वेंगुर्ला) आदींसह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. श्री. वाळके पुढे म्हणाले, २० मे पासून आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विजेची परिस्थिती भयावह आहे. महावितरणचे अधिकारी पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांसह शासनाची दिशाभूल करत आहेत. आजही महावितरणच्या म्हणण्यानुसार १६ हजार ग्राहक विजेपासून वंचित आहेत. मात्र, हा आकडा मोठा आहे. महावितरणच्या भोंगळ अन् बेजबाबदार कारभारामुळेच लाखो ग्राहक अंधारात आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी ७७ कोटींचा आराखडा तयार केला आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व दक्षता घेऊ असं लेखी पत्राने संघटनेला महावितरणकडून सांगितले गेलं होत. मात्र, पहिल्याच पावसात सगळी दैना झाली. तौक्ते सारखं वादळ असतं तर आम्ही समजू शकलो असतो. मात्र, झाड पडली, फांदी कोसळली अशी कारण अधिकारी वर्गाकडून दिली जात असून चार-चार दिवस विद्युत पुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या कारभारामुळे येथील लोकांचे मोठं नुकसान झालं आहे. अजून कोकणातला पाऊस सुरू झालेला नाही. पुढच्या तीन महिन्यांत काय परिस्थिती असेल हे सांगता येत नाही. जिल्ह्याच नुकसान होण्यास महावितरणकडील अपूरी साधनसामुग्री व अपुरे मनुष्यबळ कारणीभूत आहे. त्यामुळेच पर्यटन जिल्हा आज अंधारात गेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केल.

दरम्यान, महावितरणच्या कणकवली आणि कुडाळ या दोन्ही विभागात येणाऱ्या तालुक्यात वीज समस्या निर्माण झाली आहे. याला दोन्ही कार्यकारी अभियंता, उप अभियंतांसह कामचुकार सेक्शन ऑफिसर जबाबदार आहेत. वेंगुर्ला येथे अधिकाऱ्यांचं केलेलं निलंबन ही केवळ धुळफेक आहे‌. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना पुन्हा शासकीय कामात घेऊ नये अशी आमची मागणी आहे. महावितरणने मान्सुनपूर्व काळजी घ्यायला हवी अशाप्रकारच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत समोर आले. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे लाखो ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे वीज ग्राहक संघटनेचे समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर म्हणाले. तर जिल्हाध्यक्ष संजय लाड म्हणाले, वीज समस्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. महावितरणची यंत्रणा यामुळे कमकुवत असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळेच मोठ्या समस्येला वीज ग्राहकांना सामोरं जावं लागतं आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा