*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आई…..*
देव्हाऱ्यातला नंदादीप शांत तेवत असतो,
तशी आई नावाची ज्योत हृदयात उजळत
असते..न बघताही नंदादीप डोळ्यासमोर
तरळतो तशी आई नावाची ज्योत आयुष्य
उजळते…
कितीही जरी आली वादळे तरी ही ज्योत
थरथरत नाही, स्थिर असते विठेवरच्या विठ्ठला
सारखी मी आहे ना पाठीशी म्हणत सौम्य
हसत असते, धीर देत, तू चल ना पुढे, मी आहेच
म्हणत…तेवढ्यानेही मार्ग सुकर होत जातो,
फक्त सावलीची चाहूल घेत चालत रहावे..
सौम्य कसे रहावे हे आईकडून शिकावे जरी पोटात वादळांचे तुफान असले तरी ते कसे
पचवावे, कारण वादळे ही पचवावीच लागतात
मग ती कुंती असो वा द्रौपदी वा भीष्म…
शेवटी दोनच व्यक्ती खऱ्या असतात, एक आई व
एक विटेवरचा तो..ज्यांच्या भरवशावर हे जग
चालले आहे. बाकी सारीच नाती मग कचकड्याची, टिचकी मारताच टिचावी व त्यांची
क्षणभंगुरता कळावी, अगदीच फुसकी, कुचकामी..
हे दोन भक्कम आधारस्तंभ नसते तर.. दुनिया
केव्हाच कोलमडली असती पत्त्याच्या बंगल्या
प्रमाणे, म्हणून तर तो स्वत:मौन राहून राहून घरोघर पोहोचला आई बनून निरखत राहिला
दुरून तिला.. हलू नकोस, बघ समोर मी आहे
ना विटेवर..! अगं, तुझ्या हृदयात ज्योत बनून
मीच तर तेवतोय् ना? तू आणि मी काही वेगळे
आहोत काय?….
आई नावाचं हे पावन तीर्थ तुम्हाला सतत
शुचिर्भूत ठेवतं..ते आहे तोवर काळजी घ्या
त्याची म्हणजे तुम्हाला कसलीही काळजी
करण्याची गरज नाही…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
