*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*जलगर्विता*
सरिता रूपगर्विता,
हसत येई दुहिता
आनंद पर्वणी गीता
नादभरी सुसंगीता ।
डोंगरातून धावता,
येई न अडखळता
गीतगुंजनी संगीता
मनोहरी निनादिता ।
जल तिचे पारदर्शी,
रूप निर्मळ स्वहौशी
स्वच्छंद धुंद बेहोषी
वाहते नित स्वखुषी ।
वर्षा ऋतू मोदभरा,
भेटीत मध्ये निर्झरा
उचंबळून बावरा
जीव भेटी रत्नाकरा ।
हिरव्या प्रितबिंबात
दिसे रूप संथ शांत
थंडगार गारठ्यात
शेवाळाच्या गालिच्यात ।
शुष्क कोरड्या उन्हात,
जीव होई कासावीस
तृष्णेची आस, जीवास
नदीचा फसवा भास ।
नवनवी तिची रुपे
प्रतिऋतु नवे साज,
सौंदर्य खनी स्वरूपे
निसर्गाचा खरा साज ।
वळणातून नजारे
स्वनादात झुळझुळे,
तीर्थक्षेत्री भक्तजन
स्नानाचे होती सोहळे ।
चंचलते , जलातिते
सृष्टी जीवनदायिते,
तू माता , नीरवाहिते
जल सौंदर्य गर्विते ।
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई, विरार
