*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन- रायबागकर लिखित आशयावरून काव्यरचना*
नेहमी प्रश्नचिन्ह असतं, माझ्या जगण्यावर
टीकाटिप्पणी असते माझ्या कपड्यांवर, हास्यावर
कधी परंपरेच्या नावाने, तर कधी कर्मकांडापायी
चौकट घातली जाते माझ्या स्वप्नांच्या वाटेवर
©®संगीता देवकर
_______________________
इरादा
चातुर्वर्ण्यातील मी पायरी, सर्वात तळाची
दासी, बटिक उपाधी, पुरुषसत्ताक समाजाची
इतुकीच इच्छा आहे, ही मानसिकता बदलावी
मिळावी स्त्रीत्वाआधी संधी, माणूस म्हणून जगण्याची
@भारती महाजन-रायबागकर चेन्नई
का येताजाता माझा, होत असे उध्दार?
पाहता प्रगतदिशेचे पाऊल, का व्हावा मनी अंगार?
अष्टभुजेच्या रूपापुढती, जव होता नतमस्तक
का न येतो आठव तेव्हा, स्त्री ची महिमा अपार?
मी पंख पसरून घेतली, आहे गगन भरारी
एकविसाव्या शतकातील मी, आहे सक्षम नारी
भेदाभेद स्त्री-पुरुषांतील, अंतराळयुगीही असावा?
नको भावना करंटी, मज जन्मच नाकारणारी
ही चौकट उल्लंघण्याचा, आहे इरादा माझा
ह्या शृंखला झुगारण्याचा, आहे इरादा माझा
उच्छ्रुंखल वागण्याचा, नको मला परवाना
मर्यादेतही प्रगती करण्याचा, ठाम इरादा माझा
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
