कळणे येथे विजेच्या धक्क्याने २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
दोडामार्ग:
कळणे गावात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेचा धक्का लागून प्रताप रामराव देसाई (२९) या अविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रताप देसाई यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे घरातील सर्व सामान त्यांनी आपल्या चुलत्यांच्या घरातील वरच्या मजल्यावर ठेवले होते. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे सामान भिजले नसावे ना, हे पाहण्यासाठी प्रताप वरच्या मजल्यावर गेला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो खाली परतला नाही. कुटुंबीयांनी त्याला पाहण्यासाठी वर जाऊन बघितले असता, प्रताप जमिनीवर निपचित पडलेला दिसला.
कुटुंबियांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. तात्काळ त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
प्रतापच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची होती. तो गोव्यातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, काका, काकी आणि चुलत भाऊ असा परिवार आहे. या घटनेने देसाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

