You are currently viewing परोपकारी साहित्यिक प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर 

परोपकारी साहित्यिक प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर 

 

आज डॉक्टर भाऊ मांडवकर आमच्यात नाहीत. पण त्यांनी जिवंत असताना जी कामे करून ठेवलेली आहेत ती निश्चितच लाख मोलाची आहेत .सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी साहित्य शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात अतुलनीय काम केलेच. पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदवीधर मतदार संघाची ओळख लोकांना करून दिली.या मतदारसंघात नोंदणी केली पाहिजे. आपले उमेदवार उभे केले पाहिजेत व त्यांना निवडून आणले पाहिजेत यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या गोष्टीचा त्यांना काहीही फायदा झाला नाही .पण यातून त्यांनी आमदार प्रा. बी टी देशमुख सारख्या माणसाला विचारपीठ उपलब्ध करून दिले आणि आमदार प्राध्यापक बी टी देशमुखांनी ते तब्बल 36 वर्ष चालविले आणि पदवीधर आमदार या उपाधीला न्याय दिला .

भाऊ साहेबांच्या नावात मांडव आहे. त्यांनी निर्माण केलेल्या मांडवाखाली अनेकांना सावली मिळाली. यांचा मंडप इतका मोठा होता की त्याचा व्याप हा विदर्भातील 11 जिल्ह्यात होता.भाऊसाहेबांनी कितीतरी मुलांना प्रेरणा दिली .त्यांना प्राध्यापक केले. प्राचार्य केले .डॉक्टर केले .प्राचार्य भाऊ मांडवकर यांच्या काळ असा होता की त्या काळात आजच्या आधुनिक यंत्रणेचा अभाव होता .पण असे असतानाही त्यांनी सातत्याने परिश्रमपूर्वक दिवस-रात्र एक करून अनेक तरुणांची आयुष्य उभे केली .त्यामध्ये मी पण एक आहे

गावोगावी ग्रंथालय स्थापन करून जनजागृती करणे तिथे कार्यक्रम घेणे यासाठी भाऊ मांडवकरांनी सातत्याने प्रयत्न केले .त्यासाठी त्यांना आर्थिक झळ सोसावी लागली .पण डॉ.भाऊ मांडवकर व सिंधू मांडवकर हे दोघेही निमशासकीय महाविद्यालयामध्ये म्हणजे श्री रा सू उर्फ दादासाहेब गवई यांच्या आंबेडकर महाविद्यालय मध्ये प्राध्यापक असल्यामुळे व प्राध्यापकांना चांगला पगार असल्यामुळे त्यांनी आपल्या पगारातील बराचसा भाग सामाजिक सेवेवर खर्च केला .

आज मराठी प्राध्यापक परिषदेला खूप चांगले दिवस आलेले आहेत .अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमध्ये ही मराठी प्राध्यापक परिषद कार्यरत आहे. दरवर्षी या परिषदेची नियमित अधिवेशने होतात .पण भाऊ मांडवकर यांना ही प्राध्यापक परिषद उभे करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले. दळणवळणाची साधने कमी .कार नावाचा प्रकार नव्हताच. बसने प्रवास आणि त्यातही शेंदुर्जना घाट पासून उमरखेड पर्यंतचा पल्ला भाऊंनी आपल्या प्रचंड आत्मबलामुळे पूर्ण करून घेतला. मराठी या विषयाच्या प्राध्यापकांना सदस्य करून घेतले. अधिवेशना घेतले .त्यापैकी बऱ्याचशा अधिवेशनांना मी प्रमुख म्हणून उपस्थित होतो .आता त्यांचा हा वारसा त्यांचे चिरंजीव प्राचार्य डॉ. पवन मांडवकर हे चालवित आहेत.

 

भाऊंच्या कल मुलांनी प्राध्यापकांनी लिहिले पाहिजे याकडे जास्त होता .भाऊंची कितीतरी म्हणजे 44 पुस्तके आज उपलब्ध आहेत. त्यात माझी चाळीस भावंड हा ग्रंथ तर अमरावती विद्यापीठात नागपूर विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमामध्ये लागलेला आहे. भाऊ ही जनजागृती करीत असताना त्यासाठी त्यांनी आपल्या घराची दरवाजे 24 तास मुलांसाठी उघडे ठेवलेली आहेत .त्यांच्या घरच्या गच्चीवर आमच्या मासिक सभा व्हायच्या .कवी संमेलन व्हायचे. गेट-टु गेदर व्हायचे आणि या सर्वांचे स्वागत करण्याची जबाबदारी सिंधुताई मांडवकर यांच्यावर असायची. पवन युगंधर ललाम ही भाऊ साहेबांची मुले आदरतिथय करण्यात सिंधुताईंना मदत करायची. याशिवाय त्यांच्याकडे असलेले चांदोरे नावाचे त्यांचे सहकारी या कामी त्यांना मदत करायचे .

 

भाऊंना समाजसेवेची खरी आवड होती आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली. स्वतःच्या घरात जय सेवा वाचनालयाची स्थापना करून त्यांनी त्या काळात दुर्मिळ असलेले सर्व ग्रंथ युक्त जय सेवा वाचनालय सर्वांसाठी मोकळे केले. नाममात्र शुल्क सर्व वर्तमानपत्रे याशिवाय सर्व प्रकारचे ग्रंथ तिथे होते. माझा एम ए चा अभ्यास याच ग्रंथालयाच्या ग्रंथालयातून झाला आमची पुस्तक घेण्याची ताकद नव्हती .पण आम्हाला जी जी पुस्तकं लागली ती भाऊसाहेबांनी आम्हाला ग्रंथालयात उपलब्ध करून दिली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय मध्ये भाऊसाहेब प्रदीर्घकाळ प्राचार्य होते .त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे स्वतःचे इंदिरा महाविद्यालय सुरू केले. हे महाविद्यालय सुरू करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली .पण त्यांनी ती केली आणि खूप जोमाने काम करून आजचे इंदिरा महाविद्यालय उभे केले. आज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून इंदिरा महाविद्यालयाचा समावेश आहे.

ही सगळी कामे करण्यासाठी भाऊंना खऱ्या अर्थाने मदत केली होती डॉक्टर सिंधुताई मांडवकर यांनी. भाऊचा पाय घरात नसायचा आणि त्यांनी सोपवलेली कामे व येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत हे काम सिंधुताई पहावयाच्या . माझ्या बऱ्याच पाहुण्यांचा मुक्काम भाऊसाहेब मांडवकर यांच्या घरी करायचा. तेवढे आमचे ऋणानुबंध होते. आमचे बरेचसे कार्यक्रम भाऊ साहेबांच्या घरीच व्हायचे त्यांचे घरही मोठे होते आणि मनपण मोठे होते

 

भाऊसाहेबांची अनेक मुले आज वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत .नागपूर अमरावती नव्हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये त्यांचे वेगळे विद्यार्थी प्राचार्य प्राध्यापक तसेच प्रशासनामध्ये कार्यरत आहेत. त्यांना व आम्हाला घडवण्यामध्ये भाऊसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आमच्याकडून अभ्यास करून घेणे. आम्हाला पुस्तके उपलब्ध करून देणे. आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करणे. या साठी प्राचार्य डॉक्टर भाऊ मांडवकर सातत्याने कार्य करीत होते. आज ते आमच्यात नाहीत .पण त्यांनी केलेल्या या पुण्याईमुळे आम्ही जी उंची गाठली की निश्चितच लाख मोलाची आहे. अशा या सहृदय आमचा हा मानाचा मुजरा

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आय ए एस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा