You are currently viewing तारतम्य

तारतम्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सुलक्षा मदन देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

 

*तारतम्य*

 

मानवी जीवन हे अनेक बाबींनी बनलेले आहे. मानवी स्वभावाचे अनेक पै

 

लू आहेत. त्यातले काही पैलू जीवनात सकारात्मक दृष्टीने प्रभाव पाडतात. त्यातलाच स्वभावाचा एक पैलू म्हणजे स्वभावात ‘ तारतम्य’ असणे.

 

‘तारतम्य’ म्हणजे एखाद्या गोष्टीचे आकलन करून घेऊन, सारासार विवेकबुद्धी वापरून, योग्य अयोग्य यातील फरक समजून घेताना भावनांवर नियंत्रण ठेवून शांतपणे निर्णय घेणे किंवा तसें व्यक्त होणे अथवा त्यानुसार बोलणे. कोणतीही गोष्ट करताना योग्य प्रमाणात ती करणे. ‘ तारतम्य ‘ हे स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तीकडे आपण जे काही बोलू, वागू, कृती करू आणि याचे परिणाम काय होतील याचा विचार करण्याची क्षमता असते.

अति प्रमाणात किंवा अत्यल्प प्रमाणात कोणतीही गोष्ट करणं हे चुकीचं असतं. ‘तारतम्य’ म्हणजे दोन्ही बाजूचा साकल्याने विचारही करून सुवर्णमध्य काढून केलेली कृती किंवा उक्ती.

 

दैनंदिन जीवनात ‘तारतम्या’चे भान ठेवणे खूप जरुरीचे असते. खाण्यापिण्यात तारतम्य ठेवले नाही तर प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. बोलताना देखील कुठे, कोणाशी आणि काय बोलावे हे समजले पाहिजे, काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये हे समजले पाहिजे.

अति झोप आणि अगदी कमी झोप घेतली तर अर्थात, झोपेचे तारतम्य न ठेवल्याने त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

 

नातेसंबंधांमध्येही ‘तारतम्य’ बाळगणे खूप महत्वाचे आहे. मग ते जवळच्या नात्यांमध्ये असो, नातेवाईकांमध्ये असो वा मैत्रीच्या नात्यांमध्ये असो. सजग राहून, संयमित राहून काही वेळेला बोलताना ‘तारतम्य’ बाळगून नाती टिकवणे गरजेचे असते. अन्यथा संबंध तुटायला वेळ लागत नाही. यासाठी स्वतः ला, स्वतःच्या स्वभावाला प्रसंगी मुरडही घालावी लागते.

 

” *म्हणे रामदासी समर्थ* l

*तयासी लागला अर्थ* l

*तो केला विचारसिंथ* l

*तारतम्य* l”

 

‘तारतम्य’ हे नाव असलेला श्लोक संत रामदासस्वामींच्या दासबोध या ग्रंथात आहे. दासबोधाच्या दुसऱ्या दशकातील पहिल्या समासामध्ये ‘तारतम्य’ या विषयावर सखोल विचार केला आहे.

 

समर्थ रामदासस्वामी म्हणतात, जो खरा रामाचा दास आहे, त्याला जीवनातील अर्थ उमगतो आणि तो आचरणात, विचारात आणि कृतीत विचारपूर्वक ‘तारतम्य’ ठेवतो.

 

या समासात समर्थांनी जीवनातील विविध व्यवहारांमध्ये ‘तारतम्य’ कसे ठेवावे याचे सूक्ष्म विवेचन केले आहे.

धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांमध्ये कसे संतुलन राखावे हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

धर्माने वागताना धर्मांध न होता, व्यवहारवाद आणि धार्मिकता यांचा समतोल साधणे म्हणजेच ‘तारतम्या’ने धर्माचे आचरण करणे.

 

अर्थ म्हणजे संपत्ती. संपत्ती कमवताना नैतिकता, प्रामाणिकपणा, कष्ट यांवर भर देताना लोभ, फसवणूक यांना थारा न देता आणि वायफळ खर्चही न करता ती योग्य पद्धतीने जतन कशी करता येईल हे ज्याला जमते तेव्हा त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यात ‘तारतम्य’ हा गुण असतो.

 

काम म्हणजे विषयवासना किंवा इच्छांचा अतिरेक. या ठिकाणी संयमित जीवन हे ‘तारतम्या’चे द्योतक ठरते.

 

मोक्ष म्हणजे जीवन जगत असताना ‘आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा’ जे ज्याला साधले ती व्यक्ती ‘तारतम्या’ चे उत्तम उदाहरण ठरावे.

 

*अशा प्रकारे ‘तारतम्य’ हा गुण एक जीवनशैली म्हणून अंगिकारला, तर मोक्षाकडे वाटचाल झाल्याशिवाय राहणार नाही*.

 

©️®️

✍🏻 *सौ सुलक्षा मदन देशपांडे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा