You are currently viewing सामान्य वाटणारे ,असामान्य

सामान्य वाटणारे ,असामान्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*

 

*सामान्य वाटणारे, असामान्य*

*व्यक्तिमत्वाचे*

*देविदास नाना तांबे*

 

कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते असं म्हणतात हे अगदी खरं! इच्छा असूनही विनाकारणच एखादं काम राहूनच जातं, तसंच नानांच्या बाबतीत माझं झालं आहे! नानांची जीवनकथा जरी चारचौघासारखी असली, तरी त्यांनी परिस्थितीवर मात करून आपले जीवन किती यशस्वी केले ह्याचे आश्चर्य वाटते! लहानपण तसे गरिबीतच गेले ,वडील मुंबई ला टाटा मध्ये शिपाईपदावर होते. त्यामुळे आर्थिक स्थिती कशी असेल हे वेगळे सांगायला नको.ओतूर हे त्यांचे गाव! आई गावात राहून शेतीचं काम करत असे! पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे कुटुंब मोठे !पाच भाऊ दोन बहिणी! एकमेकावर जिवापलीकडे प्रेम. नानांचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण ओतूरलाच झाले, पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले, शिकून खूप मोठे व्हायचे आईवडिलांना सुख द्यायचे, असे विचार मनात असतांना ते ग्रॅज्युएट होण्याआधी त्यांच्या वडिलांचे निधन झाले! कुटुंबाचा भला भक्कम आधारस्तंभ कोसळला .त्याआधीच मोठ्या भावाचे लग्न ठरलेले असल्याने तांबे कुटूंबाने जड अंतकरणाने लग्नाची तयारी केली. लग्नासाठी निघालेल्या वर्‍हाडाच्या वाहनाचा खूप मोठा अपघात झाला !त्यात मोठ्या भावाचा अंतकाळ झाला! दैव जणू परीक्षा पाहत होते! घरात येणाऱ्या नववधुच्या व तिच्या माहेरच्या लोकांच्या मनाचा विचार करून स्वतःचे दुःख दूर ठेवून त्यांच्याआईने एका डोळ्यात आंसू असतांना दुसऱ्यात हासू आणत नवीन सुनेचे स्वागत केले. घरातला आणखी एक कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंबावर जणू आभाळ कोसळले होते. नाना ना प्रकर्षाने जाणवत होते की, आपण काहीतरी काम केले पाहिजे, पैशाचे सोंग आणता येत नाही मिळेल ते काम करण्याची मनाची तयारी होती. इच्छा असली की मार्ग सापडतो, नानांना चेंबूरला एका काॅन्ट्रॅक्टरकडे खाडी भरायचे काम मिळाले. काम करीत असतांनाच त्यांना एका गारमेंट एक्स्पोर्ट हाऊस मध्ये नोकरीची संधी मिळाली. कष्ट करण्याची तयारी असल्याने आनंदाने तेही काम त्यांनी वर्ष भर केले . मिळेल ते काम करून कुटूंबाची आर्थिक स्थिती सुधारायची हा विचार पक्का असल्याने त्यांची मिळेल ते काम करण्याची तयारी होती .मनात शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा! म्हणून पुण्याला येऊन कॉलेज जॉईन केले .मोठे भाऊ एका कंपनीत काम करीत होते, दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याकडे राहायला गेल्यावर योगायोगाने भावाच्या कंपनीच्या मॅनेजर शी भेट झाली पारशी असलेले आगा साहेब खुप चांगले होते .त्यांनी नानांना त्यांच्या कंपनीच्या गार्डन मेन्टेनन्स चे काम करण्याची संधी दिली! करून तर पाहू या, विचाराने नानांनी होकार दिला . नानांनी अतिशय जीव ओतून तीन महिने हे काम केले. फुलझाडे लावणे ,त्यांची निगा ठेवणे, लाॅन्स हिरवेगार ठेवणे ही कामं करतांना नाना देहभान विसरत!त्यांची कामावरील निष्ठापाहूनआणखी

एका कंपनीने त्यांना गार्डनचे काम दिले! एक वर्षभरात त्यांचेकडे चार कंपनीच्या गार्डन्स ची जवाबदारी आली ! तिथे काम करतांना त्यांना खूप आनंद मिळे! सभोवती निरनिराळी फुलझाडे , रंगीबेरंगी फुले, स्वछंदपणे उडणारी फुलपाखरे यात नाना आपले सर्व कष्ट विसरून जात.

निसर्ग जणू त्यांना साद घालीत होता .शिक्षण सुरूच होते .कॉमर्स मध्ये त्यांना ऑनर्स मिळाले !शिक्षणाची ओढ स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनी लॉ चा अभ्यास करण्यासाठी ठाणे येथील नाईट लाॅ काॅलेज जॉईन केले. नोकरीसाठी प्रयत्न सुरू असतांना त्यांना रिझर्व् बँकेचा कॉल आला, नोकरी करण्याची खूप इछा होती !घरच्यांच्या इच्छेखातर इतक्या चांगल्या बँकेची ऑफर सोडून त्यांनी लॅन्ड स्केप गार्डनिंग हा व्यवसाय निवडला .

त्यांच्या हाताखाली शंभर सव्वाशे स्त्री पुरुष कामगार होते! सगळ्यांशी त्यांचे स्नेहाचे आपुलकीचे संबंध होते परिस्थितीने वारंवार होत असलेल्या व मनाला क्लेश देणाऱ्या आघातांनी ते कणखर बनले असले तरी त्यांचे हृदय अतिशय संवेदनशील असल्याने ते सगळ्यांचे आवडते होते. जवळपास ३५ वर्षे त्यांनी हा व्यवसाय केला घरची शेती होतीच :त्यासाठी ओतूरला येणे होत होतेच. लग्नाचे वय झालेले असल्याने घरात लग्न हा विषय सुरू झाला होता. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं आपण म्हणतो, नानांच्या जीवनात असेच काही घडणार होते ते जिथे राहत होते, त्यांच्या समोरच्या घरात एक मुलगी तिथे ओतूरलाच कॉलेजमष्ये जाण्यासाठी आपल्या नातेवाईकाकडे राहत होती तिचे गाव उंब्रज! नानांची आई, वहिनी भाऊ तिला जात येता नेहमीच पाहत असत! त्यांना नानांसाठी ही मुलगी आवडली. त्यांच्या आग्रहामुळे दाखविण्याचा कार्यक्रम झाला! पण दोघांनीही साफ नकार दिला! घरातल्या लोकांची हे लग्न जुळावे अशी तीव्र इच्छा! आणि झालेही तसेच! विधात्याने आधीच ठरविल्या प्रमाणे दोघांचे लग्न ठरले, ! पूर्वाश्रमीची छाया हांडे आता अर्चना देविदास तांबे होऊन नानांच्या जीवनात आली! आपले नवे नाव आपल्या कर्तृत्वाने तिने पुरेपूर सार्थ केले! म्हणूनच made for each या न्यायाने त्यांचा संसार सुखाचा झाला, सौ अर्चनाने, नेहमीच नानांना पूर्णपणे सार्थ दिली त्यामुळेच कुटूंबात अनेक कठीण निर्णय घेताना नानांना त्रास झाला नाही पत्नीच्या सहकार्याने त्यांना मानसिक बळ मिळत असे. लग्नानंतर त्यांच्या व्यवसायाचाही चांगला जम बसला असतांना अचानक पुन्हा एकदा त्यांच्यासमोर काय करावे हा प्रश्न उपस्थित झाला.घरगुती अडचणी तर पाचवीला पूजलेल्या होत्या तीन भावांचे निधन झाले .घरची शेती कोण पाहणार? म्हणून पुन्हा पतिपत्नी दोघेही ओतूर ह्या आपल्या जन्मगावी आले .व शेती करू लागले नानांच्या कामाची एक विशेषता आहे की ते जे काम हाती घेतात ते अतिशय तन मन धन लावून मनापासून करतात. समाजकार्याची अतिशय आवड तो तर त्यांचा श्वास! मागील दहा वर्षांपासून ते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक आहेत तसेच १० वर्षापासून जय बजरंग पतसंस्थेचे चेअरमन ची जवाबदारी सहजतेने पार पाडीत आहेत. नानांचा मुलगा व मुलगी दोघेही उच्च शिक्षित आहे भाग्याने जावई व सून सुद्धा उच्चशिक्षित असल्यामुळे घराला घरपण आहे नानाजेष्ठ नागरिक संघाचे सचिव व मार्गदर्शक म्हणून काम करत असतांनाच बॉर्डरलेस पँथर्स परिवाराचा ते समूह प्रमुख म्हणून गेल्या चार पाच वर्षांपासून काम पहात आहेत. दरवर्षी ह्या समूहाचा मैत्रांगण हा दिवाळी अंक प्रकाशित होतो ह्या समूहावर त्यांचे अपत्यवत प्रेम आहे समूहावर त्यांचे सतत लक्ष असते. नवीन सभासदांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

त्यांचा स्वभाव अतिशय मोकळा आहे,

Real Happiness lies in making others happy हे त्यांचे जीवन तत्व आहे

त्यांच्या जीवनाकडे पाहिले तर जाणवते की नानां कधीच परिस्थितीला घाबरले नाहीत. नियतीने घेतलेल्या परीक्षेत ते यशस्वी झाले कामाची जिद्द व नेहमी असं तर असं, तसं तर तसं या त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे ते सतत आनंदात असतात त्यांच्याशी बोलतांना ते मला जसे समजले तसे मी लिहिले आहे जेव्हडे लिहीन तेव्हडे कमीच अशी माझ्या मनाची स्थिती झाली यातच त्यांचे कर्तृत्व, मोठेपण सामावलेले आहे .नाही का?

 

ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात एक श्लोक आहे

*तरी न्यून ते पुरते। अधिक ते सरते*।

 

(काही उणे असेल तर ते आपण पूर्ण करून घ्या व अधिक बोलले गेले असेल तर गोड मानून घ्या)

 

 

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

9421828413

प्रतिक्रिया व्यक्त करा