You are currently viewing वाफाळलेला भात नाही,

वाफाळलेला भात नाही,

वाफाळलेला भात नाही,
तव्यावरची नाही पोळी!
पुढ्यात घास,मागून शिरते,
बंदुकीची अज्ञात गोळी!

आवडलं तर मागणं नाही,
नावडलेलं टाकणं नाही!
ताठ कणा एकच सांगतो,
मृत्युसमोर वाकणं नाही!

डायनिंग टेबल सोडाच राव,
ताट नाही,पाट नाही!
मरण मात्र येतं तेव्हा,
एवढा मोठा थाट नाही!

पांढरं कफन आपलं आणि,
तिरंग्यातून त्यांचा देह!
प्रत्येक क्षण घाताचा पण,
मातीवरती सच्चा स्नेह!

आपण खातो खाण्यासाठी,
त्यांचं जितं ऱ्हाण्यासाठी!
बर्फात कुठलं ऊन पाणी,
रसिकपणे न्हाण्यासाठी?

सगळं नको तसंच असून,
तक्रारीचा नाही सूर!
दिवा तेवतो वंशाचा तो,
हजार मैल असतो दूर!

त्यांच्या डोळ्यात तेल तरी,
आपल्या डोळ्यात नसतं पाणी!
त्यांच्या घरात शोक म्हणून,
आपल्या ओठात सुरेल गाणी!

पगार मिळतो मरणासाठी,
अशी दुसरी नोकरी नाही!
थोडीतरी उब आहे,
अशी यांची भाकरी नाही!

“भारत मॉं की जय!”म्हणताच,
रक्त आतूर सांडण्यासाठी!
आपण नागरीक असतो फक्त,
वेगळ्या चुली मांडण्यासाठी!

प्रमोद जोशी,देवगड,
9423513604
*संग्रह©अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा