*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते यांच्या काव्याचे लेखिका सौ.गौरी चिंतामणी काळे यांनी केलेले रसग्रहण*
*परमानंद*
🌸🌸🌸🌸
दाटल्या काजळी काळोखात
मध्यान्न हळुवार उमलते आहे
पडघम ब्रह्ममुहूर्ताचे विलक्षण
शुचित पावनी संस्करण आहे….
काळवेळ निरागस ती मनोहर
स्पंदनी नि:शब्दी सुखदा आहे
सभोवार मांगल्याची प्रभावळ
ईश्वरीय चैतन्याचा स्पर्श आहे….
सार्थ अर्थ निष्पाप जीवनाचा
लोचनी सहज विर्घळतो आहे
ब्रह्माण्डी साक्षात्कार दिव्यत्वी
मोक्षमुक्तीचाच परमानंद आहे….
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*6 मे 2025 ( 45 )*
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी )*
📞 *(9766544908)*
आदरणीय वि. ग.सातपुते सरांची *परमानंद* ही भावकविता मोक्षाच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या एका पथिकाच्या मनाची अवस्था कथन करते.जीवन पथावर मार्गक्रमण करत असताना आता तो काळ ती वेळ आली आहे जेव्हा संपूर्ण जीवनाचे सार्थक होणार आहे.
मृत्यु ही इतका सुंदर असू शकेल का? कविवर्यांनी त्याचे केलेले वर्णन
मनाचा ठाव घेते.
*दाटल्या काजळी काळोखात* अर्थात हे नेत्र मिटत असताना अंधार दाटून आला आहे.त्या अंधारात ही *मध्यान्न* म्हणजेच मागील काळातील स्मृती दाटत आहेत.मन पाकळ्या हळुवार उमलताना ही आनंद होत आहे.एक एक स्मृतींना मागे टाकत मन सर्व पाशातून मुक्त होत आहे.
*पडघम ब्रह्ममुहूर्ताचे विलक्षण* आहेत अर्थात ब्रह्ममुहूर्ताचे मनात पडघम वाजू लागले आहेत व ही अत्यंत सुखद अनुभूती आहे.आध्यात्मात ब्रह्ममुहूर्त ध्यान योग व देवभक्ती साठी योग्य व शुभ फलदायी मानला जातो.अशा या परम पवित्र ब्रह्ममुहूर्तावर जुनी वसने त्यागून शुचिर्भूत होऊन परमात्मा सन्मुख जायचे आहे.
कविवर्य जरी म्हणत असले कि *काळवेळ निरागस* आहे तरी ती वेळ निरागस नसून तो पथिक निरागस बालकासम आपल्या माऊलीचा साक्षात्कार करत आहे.सर्व मोह माया बंधने तोडून तो भवपाश मुक्त आहे.विषय विकार नष्ट झाल्यावर राहिले आहे फक्त निरागस मन.स्पंदने शांत निःशब्द आहेत.आपले आराध्य भेटल्यावर सर्व शब्द संपतात व मन अलौकिक सुखात आनंदून जाते.
कविवर्य पुढे म्हणतात कि सभोवार ते मंगलमय ईश्वरी चैतन्य भरुन राहिले आहे.सहस्त्र रश्मींचे तेजोवलय माझ्या भवती असून आता ज्ञानोदय झाला आहे.
*सार्थ अर्थ निष्पाप जीवनाचा*
*लोचनी सहज विरघळतो आहे*
पहा कशी शब्द योजना आहे.कविवर्य म्हणतात जीवन निष्पाप आहे.जीवनाचा चालक पालक स्वयं वासुदेव कृष्ण आहे.जीवनात येणे व जाणे दैवी इच्छेने घडते.आपण कुठून आलो ?का आलो? आपला जीवनी उद्देश्य काय? …अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत व तृप्त मिटलेल्या नयनात जीवनाचे सार गवसत आहे.
*ब्रह्मांडी साक्षात्कार दिव्यत्वी*
ही ओळ अगदी मनाला स्पर्शून जाते.
ब्रह्ममुहूर्तावर आता सूर्योदयाचे वेध लागले आहेत.दिव्य दृष्टीने ब्रह्मांडाचा ,त्या तेजोमय देवत्वाचा साक्षात्कार होताना मोक्षाचे द्वार उघडले आहे.मुक्तीचे हे परमोच्च सोपान गाठताना ध्यानी मनी केवळ परमानंद आहे .
सौ. गौरी चिंतामणी काळे
